त्र्यंबकेश्वर, 11 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
कुंभमेळा जवळ येत असताना संथपणे सुरू असलेली विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिर दाेन महिने दर्शनासाठी बंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे.
या कालावधीत मंदिरातील पूजाअर्चा सुरू राहणार असून, भाविकांसाठी दर्शन तात्पुरते बंद असेल. या संदर्भातील अंतिम तारीख विश्वस्त मंडळाच्या निर्णयानंतर निश्चित करण्यात येणार आहे.
कुंभमेळ्याचा ध्वजाराेहण साेहळा 31 ऑक्टाेबरला हाेणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरला दर्शन पथ, अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, कुशावर्तासह अन्य तीर्थ व प्राचीन मंदिरांचा जीर्णाेद्धार, घाटांची उभारणी, गाेदावरी प्रवाही करण्याची याेजना अशी अनेक कामे प्रगतिपथावर आहेत. दर्शन पथासाठी शासकीय इमारती जमीनदाेस्त केल्या जात आहेत. अन्य कामांसाठी विविध रस्त्यांवर खाेदकाम सुरू आहे. भाविकांची गर्दी माेठी असल्याने या कामांत अडथळे येत असून, स्थानिकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कुशावर्त तीर्थ परिसरातील कामे ध्वजाराेहणापूर्वी पूर्ण करणे आवश्यक असल्याने अलीकडेच हे तीर्थ 31 ऑक्टाेबरपर्यंत भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे.
नाशिकचे पालक मंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वरमधील विकासकामांची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील विविध कामे भाविकांची माेठी वर्दळ असताना पूर्ण करणे अडचणीचे ठरत आहे. या संदर्भात देवस्थानचे विश्वस्त आणि नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार यांच्याशी चर्चा करण्यात आली. खाेदकामांमुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागत असून, ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी मंदिर काही कालावधीसाठी बंद ठेवण्याचा पर्याय सूचवण्यात आला.
मंदिरातील दैनंदिन पूजाअर्चा सुरू ठेवून भाविकांसाठी दर्शन तात्पुरते बंद ठेवण्याचा प्रस्ताव आहे. सुरुवातीला प्रायाेगिक तत्त्वावर दाेन महिन्यांच्या कालावधीसाठी मंदिर बंद ठेवण्याचा विचार आहे. विश्वस्त मंडळाच्या निर्णयानंतर अंतिम तारीख निश्चित केली जाईल. भाविकांना या निर्णयाची पूर्वकल्पना दिली जाणार आहे. या कालावधीत संबंधित कामे दिवसरात्र सुरू ठेवून वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
भाविकांची गैरसाेय टाळणे आणि विकासकामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी हा पर्याय निवडण्यात आला. या संदर्भात प्रशासन ठेकेदारांची बैठक घेणार आहे. त्र्यंबकेश्वरमधील विविध कामे अतिर्नित मनुष्यबळ आणि वाढीव यंत्रसामग्रीच्या मदतीने वेळेत कशी पूर्ण करता येतील, याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.