साेलापूर, 11 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
साेलापूर जिल्ह्यात तीव्र झालेली दुष्काळी परिस्थिती आणि परतीच्या पावसाच्या हुलकावणीमुळे ग्रामीण भागासह वनक्षेत्रातील नैसर्गिक जलस्राेत पूर्णपणे आटले आहेत.
त्यातच कडक उन्हाचा मारा आणि तीव्र ऑक्टाेबर हिटच्या चटक्यांमुळे माळरानावरील वन्यजीवांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू झाली आहे. या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर वन्यजीवांची तहान भागवण्यासाठी साेलापूर वन विभागाने युद्धपातळीवर पुढाकार घेतला आहे. एरवी ऐन उन्हाळ्यात एप्रिल-मेदरम्यान राबवली जाणारी कृत्रिम पाणीपुरवठ्याची माेहीम यंदा वेळेआधीच म्हणजेच थेट सप्टेंबरपासूनच सुरू करावी लागली आहे.
साेलापूर जिल्ह्याचे एकूण भाैगाेलिक क्षेत्र 14895 चाै. किमी. इतके विस्तीर्ण असले तरी त्यापैकी अवघे 28862.45 हेक्टर क्षेत्र वन विभागाच्या अखत्यारित येते. या मर्यादित वनक्षेत्राचे व्यवस्थापन साेलापूर, माेहाेळ, बार्शी, पंढरपूर, सांगाेला आणि माळशिरस या सहा परिक्षेत्रांमार्फत केले जाते.
या सर्व परिक्षेत्रांत वन्यजीवांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वन विभागाने एकूण 303 कृत्रिम पाणवठ्यांचे नियाेजन केले आहे. पावसाळा संपत आला तरी अपेक्षित पाऊस झाला नाही आणि परतीच्या पावसानेही हुलकावणी दिल्याने जंगलातील लहान डबकी, ओहाेळ, बंधारे व नैसर्गिक पाणवठ्यांत पाण्याचा थेंबही उरलेला नाही. परिणामी, ऑक्टाेबरच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचे चटके तीव्र झाले असून, तहानलेले वन्यजीव पाण्याच्या शाेधात शेतात अथवा लगतच्या मानवी वस्तीत शिरण्याचा धाेका वाढला आहे. त्यामुळे मान व वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.
असे प्रकार टाळण्यासाठी वन विभागाच्या वतीने राेज टँकरद्वारे थेट जंगलातील कृत्रिम पाणवठ्यांत पाणी साेडण्यात येत आहे. पाण्याच्या शाेधात भटकणाऱ्या प्राण्यांवर शिकारी टाेळ्यांची वक्रदृष्टी पडू नये तसेच बेकायदा लाकूडताेड आणि वणव्यांसारख्या घटना घडू नयेत म्हणून वन कर्मचारी व अधिकाऱ्यांमार्फत संवेदनशील वनक्षेत्रांत दिवस-रात्र पायी आणि वाहनांद्वारे गस्त वाढवण्यात आली आहे.