पण आता दारिद्र्य आल्यावर लाेकांचेकडून उणीदुणी ऐकून घ्यावयाची दुर्दशा प्राप्त झाली. बरे आता मुले किंवा मुली लग्नावाचून राहिल्या तर आहे तीही अब्रू जाईल या काळजीने ताे उद्विग्न झाला. उत्पन्न वाढेना पण प्रपंच व खाणारी ताेंडे मात्र वाढत चालली तर यापेक्षा वेगळी काय अवस्था हाेणार?
एका साध्या गाेष्टीच्या आधारे श्रीसमर्थ प्रापंचिक बाबतीत अतिशय माेलाचे मार्गदर्शन करीत आहेत. परमार्थ करून स्वत:चा आत्मज्ञानाने उद्धार करून घ्यावा हा त्यांचा मुख्य उपदेश आहे पण परमार्थ यशस्वी हाेण्यासाठी आधी प्रपंचही नेटका असलाच पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे आणि नेटका प्रपंच म्हणजे मर्यादित व व्यवस्थित प्रपंच हे त्यांचे मत आहे. म्हणूनच आपले कुटुंब मर्यादित ठेवले तर खर्चही मर्यादित राहताे व मगच मिळवलेल्या उत्पन्नांत खर्च भागून माणूस लग्नकार्य, आजारपण यासाठी काही द्रव्य शिल्लक टाकून त्याची तरतूद करू शकताे. यासाठीच कुटुंबाचा विस्तार मर्यादित ठेवलाच पाहिजे असे अतिशय सुयाेग्य व चिरंतन उपयाेगी पडणारे मार्गदर्शन करणारे श्रीमसर्थ म्हणूनच संत परंपरेत अलाैकिक मानले जातात हे नि:संशय!
- प्रा. अरुण गाेडबाेले,
माे. 9822016299