मुंबई, 11 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने, नियाेजनबद्ध आणि गतिमान पद्धतीने काम करावे. पाणी अडवा, पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत. पानी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेने सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या माेहिमेला गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
यावर्षी राज्यात वाॅटर कप अभियान लवकर सुरू हाेत असून, या पार्श्वभूमीवर जलसंधारणविषयक बैठकीत मुख्यमंत्री बाेलत हाेते. या बैठकीस नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ए. टी. ई. चंद्रा फाउंडेशनचे अमित चंद्रा, पानी फाउंडेशनचे सत्यजित भटकळ, अभिनेते आमिर खान यांच्यासह विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते. पशुसंवर्धन विभागाचे सचिव एन. रामास्वामी तसेच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी ऑनलाइन सहभागी झाले हाेते. जलसंधारणाच्या कामांसाठी निश्चित झालेल्या संकल्पनांच्या आधारे एकात्मिक कार्ययाेजना तयार करावी.
तिच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्षम प्रशासकीय यंत्रणा उभारण्याबराेबरच कामांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाधारित प्रणाली विकसित करावी. विविध विभागांच्या कामांचे एकत्रीकरण करून परस्पर समन्वयातून अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले. जलसंधारणाची कामे केवळ कागदावरील नियाेजनापुरती मर्यादित न राहता परिणामकारकपणे पूर्ण झाली पाहिजेत. पहिला पाऊस पडताच पाणी अडवण्यासाठी जलसंधारणाच्या संरचना सज्ज असतील आणि त्यातून भूजलपातळीत वाढ हाेण्यास मदत हाेईल, अशा पद्धतीने कामांची अंमलबजावणी करावी. या प्रयत्नांतून गावांना दुष्काळमु्नत करण्याच्या दिशेने ठाेस पावले टाकता येतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्य्नत केला.