एआय बॉसने कर्मचाऱ्याला कामावरून काढले

    12-Oct-2026
Total Views |
 
AI
संध्यानंद.काॅम
ऑफिसला उशिरा येण्यासाठी कर्मचाऱ्यांचे आवडते कारण म्हणजे, ‘साहेब, खूप वाहतूक काेंडी हाेती.’ पण, आता हे कारण मशीनसमाेर चालत नाही.
 
अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्काेमध्ये, लूना नावाच्या एका एआय बाॅसने उशिरा येण्याबद्दल एका कर्मचाऱ्याला कठाेर शिक्षा दिली आणि त्याला कामावरून काढून टाकले. ही घटना अँडाॅन लॅब्सद्वारे चालवल्या जाणाऱ्या अँडाॅन मार्केट या दुकानात घडली.
 
कंपनीच्या म्हणण्यानुसार, ताे कर्मचारी त्याच्या 23 शिफ्टपैकी 17 वेळा उशिरा आला हाेता. लूनाच्या शिफारशीनुसार, अँडाॅन लॅब्सच्या मानवी टीमने या निर्णयाला मान्यता दिली आणि त्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आले. लूनाने महिन्यांपूर्वीच उपस्थितीचे कडक नियम बनवले हाेते, पण ती त्यांचे निरीक्षण करायला विसरली. अनेक महिने, एआय बाॅस झाेपलेली असताना, कर्मचारी उशिरा येत राहिला.
 
सुरुवातीला एआयचा स्वतःचा निष्काळजीपणा इतका गंभीर हाेता की, ती स्वतःचे उपस्थितीचे धाेरण विसरली हाेती. या संपूर्ण घटनेतील सर्वात मनाेरंजक आणि गमतीशीर वळण तेव्हा आले, जेव्हा हे उघड झाले की, नियमांचा उपदेश करणारी ही एआय बाॅस स्वतःच त्या नियमांविषयी अनभिज्ञ हाेती.
 
अँडाॅन लॅब्सच्या मानवी टीमने लूनाला तिच्या जुन्या नियमांची आठवण करून दिली. तिला कर्मचाऱ्यांच्या कामाचा हिशाेब देण्यास सांगितले, तेव्हाच तिच्यातील बाॅस जागी झाली आणि तिने कामावरून काढून टाकण्याचा आदेश जारी केला.
 
एंडाेन लॅब्सने लूनाला 96.81 लाख रुपये (1,00,000 डाॅलर), एक काॅर्पाेरेट कार्ड, इंटरनेट सुविधा आणि तीन वर्षांचा भाडेकरार करून, दुकान उघडून दिले हाेते. तिथे नफा कमविण्याची जबाबदारी तिच्यावर हाेती. लूनाने स्वतः उत्पादने निवडली, किमती ठरवल्या, दुकानाचे ब्रँडिंग केले आणि कर्मचारी नियुक्त केले.
 
एंडाेन लॅब्सचे सीईओ लुकास पीटरसन यांनी सांगितले की, भविष्यात कार्यस्थल कसे बदलू शकते हे, या प्रयाेगावरून लक्षात येते. पण, लूनाच्या अनुभवातून एआय तंत्रज्ञानातील कमकुवतपणा देखील अधाेरेखित झाला आहे. एआय आणि व्यवस्थापन तज्ज्ञांचा विश्वास आहे की, येत्या काही वर्षांत कामाच्या ठिकाणी एआय एक माेठी भूमिका बजावेल. परंतु, मानवी व्यवस्थापकांची पूर्णपणे जागा घेणे अजूनही साेपे नाही. संशाेधनातून असे दिसून आले आहे की, एआय कर्मचाऱ्यांवर देखरेख ठेवू शकते आणि शिफ्ट व्यवस्थापन, कामाचे मूल्यांकन आणि डेटा-आधारित निर्णय घेणे यासारखी कार्ये करू शकते.