नाशिकला होणार रामायणावर आधारित जागतिक दर्जाचे उद्यान

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत डिजिटल केंद्रालाही मंजुरी

    10-Oct-2026
Total Views |
 
KumbhMelaNashik
नाशिक, 9 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
नाशिकचा पाैराणिक व ऐतिहासिक वारसा जगासमाेर आणण्यासाठी रामायणावर आधारित जागतिक दर्जाचे उद्यान उभारण्यात येणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आडगाव शिवारातील आरक्षित जागेत हा प्रकल्प साकारण्यात येईल. याबराेबरच पंचवटीतील गणेशवाडीत डिजिटल अनुभव केंद्र (डीईसी) विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (डीबीएमओटी) तत्त्वावर केले जाणार आहेत.
 
महापाैर हिमगाैरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत आडगाव शिवारात रामायण उद्यान, गणेशवाडी मार्केट येथे डिजिटल अनुभव केंद्र (डीईसी) आणि नाशिक राेड विभागातील प्रभाग क्रमांक 22 मधील यशवंत मंडईचा (डीबीएमओटी) तत्वावर विकास करण्यास सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांसाठी रचना, बांधा, वित्तीय साह्य, संचालन आणि हस्तांतर (डीबीएमओटी) पद्धतीचा वापर करण्याचे नियाेजन आहे. त्यामुळे महापालिकेला प्रकल्पावर पैसे खर्च करावे लागणार नाहीत. त्याऐवजी काही वर्षासाठी ताे विकसित करणाऱ्या कंपनीला संचालनासाठी दिला जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. आडगाव शिवारातील सर्वे क्रमांक 772 पैकी महापालिकेच्या आरक्षित क्षेत्रात रामायण आधारित उद्यान उभारण्यात येणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने या माध्यमातून पर्यटनाला चालना दिली जाईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या उद्यानात रामायणातील विविध प्रसंग प्रत्यक्ष अनुभवता येतील. त्यासाठी 360 अंशांतील इमर्सिव्ह डाेम, राॅयल अ‍ॅम्फी थिएटर, श्रीराम मंदिराची प्रतिकृती, खाद्यगृह आदी पर्यटन सुविधांचा अंतर्भाव असेल. नाशिकचा इतिहास, पाैराणिक पार्श्वभूमी, ऐतिहासिक व अध्यात्मिक ओळख प्रभावीपणे पर्यटकांसमाेर मांडण्यासाठी गणेश वाडी मार्केट येथील साडेसात हजार चाैरस मीटर जागेवर अत्याधुनिक डिजिटल अनुभव केंद्र विकसित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या केंद्रात नाशिकची यशाेगाथा डिजिटल तंत्रज्ञान, आभासी अनुभव, प्राेजेक्शन मॅपिंग, दृक्श्राव्य माध्यमांचा वापर करून सादर केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. वर्षभर हे केंद्र खुले असणार आहे.