रत्नागिरी, 9 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात आता स्वतंत्र मराठी भाषा विकास कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिले.
राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि भाषा अधिकाऱ्यांसाेबत त्यांनी ऑनलाइन बैठक घेतली. मराठी भाषा विभागाचे सचिव किरण कुलकर्णी ऑनलाइन सहभागी झाले हाेते. प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा त्याच्या परिसरात मराठी भाषा विकास कक्ष सुरू केला जाईल. यासाठी जिल्हा प्रशासनाने 500 ते 600 चाैरस फुटांची जागा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या कक्षाची आस्थापना, फर्निचरचा सर्व खर्च मराठी भाषा विभागामार्फत केला जाईल. जिल्हा प्रशासनावर याचा आर्थिक भार पडणार नाही, असे सामंत यांनी सांगितले.
मराठी भाषा अधिकारी जरी विभागामार्फत नियु्नत असले तरी त्यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली व समन्वयाने काम करणे बंधनकारक राहील. जिल्ह्यातील साहित्य संमेलनांचे आयाेजन, स्थानिक साहित्यिकांशी संपर्क, दुर्लक्षित व अप्रकाशित साहित्याचे पुनरावलाेकन करून ते वाचनालयांपर्यंत पाेहाेचवणे असे महत्त्वाचे उपक्रम प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा अधिकाऱ्यांमार्फत राबवले जातील. यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.