आकांक्षित जिल्ह्यांत गडचिरोली देशात अव्वल

विविध कामांची दखल : नीती आयोगाच्या डेल्टा रँकिंगमध्ये अव्वल

    10-Oct-2026
Total Views |

Gadchi 
गडचिराेली, 9 ऑक्टाेबर (आ.प्र.) :
दुर्गम आणि आदिवासीबहुल अशी ओळख असलेल्या गडचिराेली जिल्ह्याने विकासाच्या विविध क्षेत्रांत केलेल्या कामांची देशपातळीवर दखल घेतली गेली आहे. नीती आयाेगाच्या आकांक्षित जिल्ह्यांच्या एप्रिल ते जून या तिमाही डेल्टा रँकिंगमध्ये गडचिराेलीने देशात प्रथम क्रमांक पटकावला. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याने दुसरा क्रमांक मिळवला आहे. मुख्यमंत्री तथा गडचिराेलीचे पालक मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या कामगिरीचे काैतुक केले आहे.
 
देशभरातील 112 आकांक्षित जिल्ह्यांच्या विकासाची विविध निकषांवर नियमितपणे पाहणी केली जाते. आराेग्य व पाेषण, शिक्षण, कृषी व जलसंधारण, आर्थिक समावेशन व काैशल्य विकास; तसेच मूलभूत पायाभूत सुविधांशी संबंधित निर्देशांकांत कालावधीनुसार झालेली सुधारणा या प्रक्रियेत महत्त्वाची ठरते. त्यामुळे गडचिराेलीचा अव्वल क्रमांक विविध विकास निर्दे शांकांत झालेल्या एकत्रित सुधारणांचे प्रतिबिंब मानला जात आहे.
 
गडचिराेलीच्या या कामगिरीत कृषी आणि जलसंधारण क्षेत्रातील कामाला विशेष महत्त्व आहे. जलयु्नत शिवार अभियान आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन याेजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात सहा हजार जलसाठे उभारण्यात आले आहेत. पाण्याची उपलब्धता वाढवणे आणि शेतीला सिंचनाची जाेड देण्याच्या या प्रयत्नांचा कृषी क्षेत्रातील प्रगतीला हातभार लागला. शिक्षण आणि आर्थिक समावेशनाच्या क्षेत्रातही विविध उपक्रम राबवण्यात आले. काैशल्य विकासाच्या उपक्रमांना महिंद्रा, लाॅयड्स आणि टाटा ट्रस्टसारख्या संस्थांचेही सहकार्य मिळाले.
 
प्राथमिक आराेग्य केंद्रांच्या माध्यमातून आराेग्य सुविधा बळकट करण्याबराेबरच गर्भवती महिलांना सकस आहार मिळावा, यासाठीही विविध उपक्रम राबवण्यात आले. कृषी, जलसंधारण, आराेग्य, शिक्षण, बँकिंग आणि काैशल्य विकास, अशा अनेक क्षेत्रांतील प्रयत्नांचा एकत्रित परिणाम डेल्टा रँकिंगमध्ये दिसून आला आहे.