राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुले

पावसाळी विश्रांतीनंतर घेता येणार जंगलाचा अनुभव

    01-Oct-2026
Total Views |
 
TigerProject
नागपूर, 30 सप्टेंबर (आ.प्र.) :
पावसाळ्यातील हिरवाई, चिखल आणि धुक्याची चादर दूर हाेत ऑक्टाेबरमध्ये जंगलांचे रूप पुन्हा बदलते. निळेशार आकाश, काेवळे ऊन आणि पावसानंतर बहरलेली वनराई पर्यटकांना खुणावू लागते. त्यातच अनेक व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्ये पावसाळी विश्रांतीनंतर पर्यटकांसाठी पुन्हा खुली हाेत असल्याने वन्यजीवप्रेमींची प्रतीक्षा संपते.
 
पावसाळ्यात वनक्षेत्रांत पर्यटकांच्या प्रवेशावर निर्बंध असतात. या काळात वन्यजीवांना प्रजनन आणि अधिवासासाठी आवश्यक असलेली शांतता मिळते.
 
मुसळधार पावसामुळे खराब झालेले रस्ते, सफारी मार्ग आणि अन्य सुविधा दुरुस्त करण्यासाठीही वन विभागाला वेळ मिळताे. त्यामुळे ऑक्टाेबरपासून सुरू हाेणारा सफारी हंगाम हा केवळ पर्यटकांसाठीच नव्हे, तर जंगल व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरताे.
 
पावसाळ्यानंतर जंगलात सर्वत्र हिरवळ पसरलेली असते. जलस्राेतांमध्ये पाण्याची उपलब्धता वाढलेली असते आणि अनेक भागांत वन्यजीवांच्या हालचालीही पाहायला मिळतात. सकाळच्या काेवळ्या उन्हात किंवा सायंकाळी वन्यप्राण्यांचे दर्शन घेण्यासाठी हा काळ पसंतीचा मानला जाताे. वाघ पाहण्यासाठी देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठीही ऑक्टाेबरपासून सफारीचा नवा हंगाम सुरू हाेताे.
 
राज्यातील ताडाेबा-अंधारी, मेळघाट, पेंच व्याघ्र प्रकल्पासह मध्य प्रदेशातील कान्हा, बांधवगड, पेंच आणि सतपुडा, राजस्थानातील रणथंभाेर, तसेच कर्नाटकातील बंडीपूर आणि नागरहाेळ यांसारखी ठिकाणे वन्यजीवप्रेमींच्या आकर्षणाचे केंद्र ठरतात. याशिवाय देशातील विविध राज्यांतील अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पांत ऑक्टाेबरपासून सफारीचे वेळापत्रक आणि उपलब्ध मार्गांत बदल हाेऊ शकताे.
 
काही ठिकाणी पावसाची स्थिती, रस्त्यांची अवस्था किंवा स्थानिक व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार काही भाग बंद ठेवले जाऊ शकतात.