मुंबई, 30 सप्टेंबर (आ.प्र.) :
राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डाॅलरपर्यंत नेण्याच्या उद्दिष्टात पायाभूत सुविधांची भूमिका महत्त्वाची आहे. त्याला अनुरूप वेगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने काम करावे.
रस्ते आणि पुलांपुरते मर्यादित न राहता राज्याच्या सर्वांगीण आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी केली.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अभियंता दिनानिमित्त मागील दाेन वर्षांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अभियंते आणि कर्मचाऱ्यांच्या गाैरव करताना ते बाेलत हाेते.
यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव शरद राजभाेज, सचिव आबासाहेब नागरगाेजे, महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक राजेश निघाेट, सचिव संताेष शेलार, सचिव प्रशांत औटी, मुंबई सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंता प्रज्ञा वाळके, मुंबई सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड यांच्यासह विभागाचे अधिकारी, अभियंते, कर्मचारी उपस्थित हाेते.
दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार दुष्काळ निधीसाठी देणार असल्याचे जाहीर केले. या पुढाकाराबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांनी संघटनेचे अध्यक्ष अभियंता प्रमाेद माने आणि पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
म्हैसकर यांनीही मनाेगत व्य्नत केले. यावेळी उत्कृष्ट अभियंता, उत्कृष्ट रस्ते, उत्कृष्ट पूल आणि उत्कृष्ट इमारत अशा विभागांतील तीसहून अधिक पुरस्कारांचे वितरण शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते करण्यात आले.