दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे दिव्यांगांना कृत्रिम अवयव

    31-Jan-2026
Total Views |

Dagdusheth Halwai Ganapati Trust
 
 
पुणे, 30 जानेवारी (आ.प्र.) : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या पुढाकाराने जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत राज्यातील 1771 दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्यात येत आहेत. बाजीराव रस्त्यावरील ट्रस्टच्या आराेग्य सेवा केंद्र, हिराबाग काेठी येथे शिबिर आठवडाभर चालणार आहे.
 
टाटा ऑटाेकाॅम सिस्टिम्स, पिनॅकल इंडस्ट्रीज आणि श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर फूट (इंदूर) यांच्या सहकार्याने शिबिर आयाेजिण्यात आले आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी टाटा ऑटाेकाॅम सिस्टिम्स लि.चे व्हाइस चेअरमन डाॅ. अरविंद गाेयल, सुमती गाेयल, पिनॅकल इंडस्ट्रीज लि.चे चेअरमन डाॅ. सुधीर मेहता, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, काेषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमाेल केदारी, उत्सव प्रमुख अक्षय गाेडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांच्यासह सुवर्णयुग तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित हाेते.
 
उपक्रमाचे हे 4 थे वर्ष आहे. गरजू रुग्णांपर्यंत पाेहाेचणे हा आमचा उद्देश आहे. कृत्रिम अवयव लावल्यानंतर आपण काम करायला हवे, असे डाॅ.मेहता यांनी सांगितले. पुण्याप्रमाणेच नागपूर, विदर्भ या भागातही भविष्यात शिबिर आयाेजित केले जाईल; तसेच दिव्यांगांना राेजगार मिळेल या दृष्टीनेही प्रयत्न हाेतील, असे डाॅ. गाेयल यांनी सांगितले. पुण्यासह लातूर, पराभणी, साेलापूर, सांगली, सातारा, काेल्हापूर, अहिल्यानगर, धाराशिव येथून अनेक दिव्यांग शिबिरासाठी आले असून, गाेव्यातूनही रुग्ण आले आहेत.
 
आजपर्यंत ट्रस्टच्या पुढाकाराने 7 हजार दिव्यांगांना कृत्रिम अवयव देण्यात आले आहेत. शिबिरात व्हीलचेअर, कुबड्या, काठ्या, कॅलिपर, जयपूर फूट देण्यात येत आहेत. विशेष म्हणजे पाेलिओग्रस्त बालकांसाठी विशेष व्हीलचेअर देण्यात आल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले.