ज्ञातृज्ञेयाविहीन । नुसधेंचि जें ज्ञान ।सुखा भरलें गगन । गाळींव जें ।। 15.77

    30-Jan-2026
Total Views |
 

saint
 
या पंधराव्या अध्यायात भगवान गाेपालकृष्ण विराट अविनाशी अशा ब्रह्मवृक्षाचे वर्णन करीत आहेत. नवल असे की, याचे मूळ ऊर्ध्व म्हणजे वर आकाशाकडे आहे.

आणि त्याच्या शाखा खाली आहेत. असा हा अश्वत्थ वृक्ष अविनाशी आहे. याची पाने वेद आहेत. हा प्रपंचरूपी वृक्ष त्याला जाणणारा खरा वेदवेत्ता हाेय.

खरे पाहता ब्रह्माच्या ठिकाणी वर, खाली, मध्य असे काही नाही. कानाला विषय न हाेता नादाचा आनंद हाेताे. नाकाने वास न घेता वास घेतल्याचे समाधान मिळते. याला अलीकडे व पलीकडे असे नाही. मागे पुढे नाही. स्वभावत: इंद्रियांना ते अगाेचर आहे. असे हे ब्रह्म ज्ञाता, ज्ञेय यांवाचून केवळ ज्ञानमय आहे. हे आकाशापेक्षा सूक्ष्म असून सुखाने भरलेले आहे.

हे काेणाचे कार्य नाही आणि काेणाचे कारणही नाही. त्याला दुसरे काेणी नाही. दुसऱ्याच्या अपेक्षेने येणारा एकटेपणा त्याला नाही. ते आपणच आपल्याला आहे. अशी ही सत्यवस्तू या संसारवृक्षाचे ऊर्ध्व आहे. तिच्या ठिकाणी अंकुर निघाले असे मात्र नाही. या वृक्षाच्या मुळाशी असणारी माया असून नसल्यासारखी आहे. तेव्हा वांझेच्या संततीचे वर्णन काय करावे ? तिला विचाराचे नावही सहन हाेत नाही.

पण ती संसारवृक्षाचे बी मात्र आहे. ही माया संपूर्ण विश्वरूपी वस्त्राची घडी केलेली आहे. ही ब्रह्माच्या ठिकाणी नसते आणि असतेही. आपण झाेप घेताे, ज्याेतीची काजळी वाढली की दिवा मंद हाेताे, त्याप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणची माया त्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञानास जाणते. म्हणजे ती नेणती हाेते. पूर्ण अज्ञान ही निद्रावस्था आहे. संसारवृक्षाचा खालचा व वरचा भाग असून असंख्य देहांचे अंकुर खाेलवर रुजलेले असतात.