मुंबई, 29 जानेवारी (आ.प्र.) : स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन’ याेजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ही याेजना म्हणजे श्रद्धा, सुविधा आणि सामाजिक न्यायाचा सुरेख संगम आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले. ही याेजना ‘स्वस्त आणि सुरक्षित’ या ब्रीदवाक्यावर आधारित असून, सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल, अशा शुल्कात धार्मिक पर्यटनाची अनुभूती देण्याचा तिचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने एसटी प्रवासासाठी विविध सामाजिक घटकांना दिलेल्या सर्व सवलती या याेजनेत जशाच्या तशा लागू राहणार आहेत. महिला व ज्येष्ठ नागरिकांना मूळ तिकिटावर 50 टक्के सवलत, तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य प्रवास देण्यात येणार आहे. याेजनेंतर्गत प्रत्येक आगार कार्यक्षेत्रातून 40 प्रवाशांचा गट तयार करून, त्यांच्या सामाजिक सवलतीच्या तिकीट दरात सहली आयाेजित केल्या जाणार आहेत. या सहलींसाठी एसटीच्या नव्या, सुरक्षित आणि आरामदायी बस उपलब्ध करण्यात येणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर हाेईल, असे एसटीने स्पष्ट केले आहे.
प्रवाशांच्या मागणीनुसार प्रत्येक आगारातून किमान 5 बस या याेजनेसाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याने, राज्यभरात एका दिवशी सुमारे 1000 ते 1250 धार्मिक व पर्यटन विशेष बसगाड्या धावणार आहेत. त्यामुळे धार्मिक पर्यटनाला नवे बळ मिळेल, असा विश्वासही एसटीने व्यक्त केला आहे.
प्रवाशांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन, 11 मारुती दर्शन, पंढरपूर अक्कलकाेट, तुळजापूर, काेल्हापूर पन्हाळा जाेतिबा, गणपती पुळे, शेगाव, शिर्डी आदी विविध ठिकाणी सहलींचे आयाेजन करण्यात येणार आहे.
राज्याच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक वैभवाचा अनुभव घेण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.