बालगृहातील बालकांनी अनुभवला ‘सूर्यकिरण’चा थरार

नाशिक जिल्ह्यातील विविध बालगृहांतील 180 बालकांची उपस्थिती

    30-Jan-2026
Total Views |
 
sunshine
 
नाशिक, 29 जानेवारी (आ.प्र.) : जिल्हा प्रशासन व हवाई दलाच्या माध्यमातून ‘सूर्यकिरण एराेबॅटिक शाे’ पथकाच्या थरारक प्रात्यक्षिकाचा प्रत्यक्ष अनुभव जिल्ह्यातील विविध बालगृहांतील बालकांनी अनुभवला. गंगापूर धरण परिसरात आयाेजित या कार्यक्रमात बालकांनी आकाशात सादर हाेणाऱ्या आकर्षक कसरती, वेगवान विमानांची मांडणी आणि शिस्तबद्ध उड्डाण काैशल्य जवळून पाहिले, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यात आत्मविश्वास, जिज्ञासा व देशभक्तीची भावना दृढ करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या सहकार्यातून राबवण्यात आला.

हवाई कसरतींदरम्यान आकाशात रंगांची उधळण करत सादर करण्यात आलेल्या विविध रचना पाहून बालकांमध्ये विशेष उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. या उपक्रमात जिल्ह्यातील सुमारे 180 बालकांनी सहभाग नाेंदवला. महिला व बाल विकास विभाग, जिल्हा प्रशासन, तसेच बालकल्याण समितीने समन्वयाने याचे नियाेजन केले हाेते.

यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे अधिकारी, बालकल्याण समिती नाशिकचे पदाधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाइल्ड हेल्पलाइन, तसेच विविध संस्थांमधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित हाेते. बालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यात आली हाेती. या उपक्रमामुळे बालकांना वेगळा आणि प्रेरणादायी अनुभव मिळाला असून, त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हेच या उपक्रमाचे खरे यश असल्याची भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.