काेल्हापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देणाऱ्या आणि नागरिकांना दिलासा देणाऱ्या राज्य शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे. पालक मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली काेल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या महसूल विभागाने धडक माेहीम राबवून जिल्ह्यातील 1200 गावांतील 60 हजार गट नंबर डीम्ड एनए (मानीव अकृषिक) म्हणून घाेषित केले आहेत. या निर्णयाची राज्यात सर्वप्रथम अंमलबजावणी काेल्हापुरात झाली असून, याचा थेट लाभ 3 लाख नागरिकांना मिळणार असल्याची माहिती आबिटकर यांनी दिली.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम-1966 चे कलम 42 आणि 2022 च्या शासन परिपत्रकानुसार, गावठाणाच्या हद्दीपासून 200 मीटरच्या परिघीय क्षेत्रातील जमिनी अकृषिक समजल्या जाव्यात, असे निर्देश आहेत.
यानुसार काेल्हापूर जिल्हा प्रशासनाने आणि भूमी अभिलेख विभागाने विशेष माेहीम राबवून रहिवासी, वाणिज्य व औद्याेगिक वापरासाठीच्या जमिनींचे गट नंबर व सर्व्हे नंबर निश्चित केले. पूर्वीच अकृषिक झालेल्या जमिनी वगळून उर्वरित 60 हजार गट नंबरच्या क्षेत्रनिहाय याद्या तयार करण्यात आल्या आहेत. या महत्त्वपूर्ण याद्यांचे प्रस्ताव आबिटकर यांच्या हस्ते संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द करण्यात आले. या निर्णयाची कार्यपद्धती स्पष्ट करताना अधिकाऱ्यांनी सांगितले, की आता तहसील कार्यालयामार्फत संबंधित जमीनधारकांना अकृषिक आकारणीचे चलन पाठवले जाईल. जमीनधारकाने शासनाच्या प्रचलित तरतुदींनुसार अकृषिक कर जमा केल्यानंतर तहसीलदार त्यांना तत्काळ अकृषिक सनद प्रदान करतील. या सुलभ प्रक्रियेमुळे नागरिकांचा माेठा त्रास वाचणार आहे.