गंगापूर धरण परिसरातील अवकाशात भरदुपारी सूर्यकिरण एअराे शाेमुळे जणू काही इंद्रधनू साकारल्याचा अविस्मरणीय अनुभव नाशिकरांना अनुभवायला मिळाला. निमित्त हाेते हवाई दलाच्या सूर्यकिरण टीमने साकारलेल्या एराेबॅटिक शाेचे. या प्रात्यक्षिकांवेळी अवकाशात केशरी, पांढरा आणि हिरवा रंग भरत बलशाली भारताचे प्रतिबिंब या टीमने साकारले. भारत माता की जय, वंदे मातरम्च्या जयघाेषाने गंगापूर धरण परिसर दुमदुमून गेला. सूर्यकिरण टीमने शेवटचे प्रात्यक्षिक सादर करत नाशिककरांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार मानले.हवाई दल आणि जिल्हा प्रशासनातर्फे नाशिक फेस्टिव्हल अंतर्गत दाेनदिवसीय एराेबॅटिक शाे गंगापूर धरण परिसरात पार पडला. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले, विभागीय आयु्नत डाॅ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयु्नत शेखर सिंह, महापालिका आयु्नत मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, आशिमा मित्तल (जालना), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, पाेलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आदी अधिकाऱ्यांसह नाशिककरांनी माेठी गर्दी केली हाेती.
सूर्यकिरण टीमने थरारक प्रात्यक्षिके सादर करत नागरिकांच्या डाेळ्यांचे पारणे फेडले. हवाई दलाचे स्क्वाॅड्रन लीडर तेजेश्वर सिंह, ललित वर्मा, राहुल सिंह, एडवर्ड प्रिन्स, विष्णू, अंकित वशिष्ट, संजय सिंह, विंग कमांडर जसबीर सिंह, अभिमन्यू त्यागी यांनी हाॅक 132 या विमानांच्या साह्याने चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली. या टीमने आकाशात रंगांची उधळण करताना इंग्रजीतील वाय, मिग विमान, बाण, प्रेमाचे प्रतीक साकारत नाशिककरांना समर्पित केले.तत्पूर्वी या गीतांमुळे परिसरात देशभ्नतीपर वातावरण निर्माण झाले हाेते. पाेलीस दलाच्या बॅण्ड पथकाने देशभ्नतीपर गीते सादर केली. या प्रात्यक्षिकांचे धावते वर्णन फ्लाइट लेफ्ट.कवल संधू यांनी केले. या कार्यक्रमापूर्वी ऑलिंपिक नाैकानयनपटू दत्तू भाेकनळ यांच्या नेतृत्वाखाली खेळाडूंनी गंगापूर धरणात नाैकानयनाची प्रात्यक्षिके सादर केली.