आरे ते कफ परेड भुयारी मेट्राे 3 मार्गिका पूर्ण क्षमतेने धावू लागल्यानंतर ऑक्टाेबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत प्रवाशांची संख्या दुपटीने वाढली आहे.सप्टेंबर 2025 मध्ये 19 लाख 70 हजार प्रवासी मेट्राेतून प्रवास करत हाेते. आरे ते कफ परेड मेट्राे सुरू झाल्यानंतर ऑक्टाेबरमध्ये 38 लाख 63 हजार 741 प्रवाशांनी प्रवास केला. डिसेंबर अखेरपर्यंतच्या एक काेटी 29 लाख 78 हजार 262 प्रवाशांनी प्रवास केला.मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्राे मार्गिकेचे बांधकाम मुंबई मेट्राे रेल काॅर्पाेरेशनने (एमएमआरसी) केले आहे. या मार्गिकेचे संचलन- देखभालीची जबाबदारीही एमएमआरसीवर आहे. मेट्राे 3 मार्गिकेचे काम तीन टप्प्यांत करून एमएमआरसीने ही मार्गिका टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल केली आहे. आरे ते बीकेसी असा पहिला टप्पा ऑक्टाेबर 2024 मध्ये,बीकेसी ते आचार्य अत्रे चाैक टप्पा मे 2025 मध्ये, तर आचार्य अत्रे चाैक ते कफ परेड टप्पा ऑक्टाेबरमध्ये सेवेत दाखल झाला.पहिल्या टप्प्याला अत्यल्प प्रतिसाद मिळत हाेता.
दिवसाला 20 हजार प्रवासी प्रवास करत हाेते. दुसरा टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवासी संख्या काहीशी वाढली. मात्र, ही प्रवासी संख्या समाधानकारक नव्हती. ऑक्टाेबरमध्ये तिसरा आणि शेवटचा टप्पा सेवेत दाखल हाेऊन मेट्राे 3 मार्गिका आरे ते कफ परेड अशी पूर्ण क्षमतेने धावू लागल्यानंतर मात्र भुयारी मेट्राेकडे प्रवासी आकर्षित हाेऊ लागले.सप्टेंबरमध्ये आरे ते आचार्य अत्रे चाैक असा दुसरा टप्पा सेवेत दाखल झाल्यावर या मार्गिकेवरून महिन्याभरात 19 लाख 70 हजार प्रवाशांनी प्रवास केला. ऑक्टाेबरमध्ये ही संख्या दुपटीने वाढली.या महिन्यात प्रवासी संख्या 38 लाख 63 हजार 741 वर पाेहाेचली. नाेव्हेंबरमध्ये ती 44 लाख 58 हजार 436 वर आणि ऑक्टाेबरमध्ये 46 लाख 56 हजार 85 वर पाेहाेचली. मेट्राे 3 पूर्ण क्षमतेने धावू लागल्यानंतर तीन महिन्यांत या मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या एक काेटी 29 लाख 78 हजार 262 वर गेली. दैनंदिन प्रवासी संख्येतही वाढ झाली आहे. नवीन वर्षात एमएमआरसीने मेट्राेच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आता नवीन वर्षात या मार्गिकेला कसा प्रतिसाद मिळताे याकडे एमएमआरसीचे लक्ष लागले आहे.