हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर लवकरच राजमाता जिजाऊमाँसाहेब आणि स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ यांचा बालशिवबासह, असा हा पुतळा राहणार आहे. या नियाेजित पुतळ्याची जागाही निश्चित करण्यात आली आहे.समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा इंटरचेंज फेज क्रमांक 7 येथे हा पुतळा उभारण्यात येणार आहे.सिंदखेडराजात येणाऱ्या व या नगरीचा निराेप घेणाऱ्यांना या पराक्रमी मातापुत्राचे दर्शन हाेणार आहे. या पुतळ्याच्या कामाची प्रारंभिक शासकीय प्रक्रिया लवकरच सुरू हाेणार आहे. नियाेजितपुतळा उभारणीच्या मागणीची गंभीर दखल घेत बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी याला चालना दिली.राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिनी पालकमंत्री मकरंद पाटील आणि सह पालकमंत्री संजय सावकारे यांनी सिंदखेडराजात राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यातील जिजाऊ जन्मस्थळी राजमाता जिजाऊंना अभिवादन केले.