घराला रिस्टाइल करा आणि तेही माेफत!

    14-Jan-2026
Total Views |
 

home 
 
आत्मविश्वास, श्रद्धा-आस्था, सकारात्मक ऊर्जा आणि अनुकंपनाचे (एनर्जी/वायब्रेशन) उगमस्थान म्हणजे घरच आहे.जीवनासाठीचा उत्साह, ध्यास, जाेश आणि परिश्रमाचा प्रचंड धबधबा म्हणजे घर. अशाप्रकारे घर अनेक पद्धतीने आपल्याला आशीर्वादरूप असते. परंतु त्याचे हे वैशिष्ट्य नेहमीच राखले जाईल असे वातावरण निर्माण करणे आणि ते टिकवून ठेवणे हा आपला धर्म आहे. या धर्माचे पालन कारण्यासाठी मनाची प्रसन्नता फार महत्त्वाची गाेष्ट आहे.ही प्रसन्नता मिळविण्यासाठी घराची सजावट, अंतर्गत रचना इत्यादींमध्ये समयांतराने बदल करत राहावेत. रचनेच्या दृष्टीने प्रत्येक रूमच्या डिझाइनमध्ये असे फेरफार करा की, नवा लूक उभा राहील आणि त्याचबराेबर तुम्ही एक नवा ताजेपणा अनुभवाल. अगदीच कमी खर्चात किंवा जवळ-जवळ माेफत अशा प्रकारे खाेलीला रिस्टाईल करणे ही एक कला आहे.
 
आणि ही कला फक्त इंटिरियर डेकाेरेशन किंवा डिझाइनची नाही, पण आनंदी जीवन जगण्याची कला आहे!. घराला आशीर्वादरूप बनविण्याची कला आहे! निवांतपणाच्या एखाद्या क्षणी काय तुम्हाला असे वाटले आहे की, तुमच्या घराचा सध्याचा डिझाइनर लूक जुना-पुराणा झाला आहे? लिव्हिंग रूम, बेडरूम किंवा संपूर्ण घराच्या लूकला एक नवे रूप देऊ इच्छित आहात? पण यासाठी स्ट्रक्चरल डिझाइन बदलण्यास किंवा सुशाेभन सामुग्री खरेदी कारण्यासाठी तुम्ही तयार नाही?असे असूनही तुम्ही तुमच्या घराला अगदीच नवे आणि प्रेरक लूक देऊ शकता! बस! त्यासाठी तुम्हाला डिझाइन निष्णांताप्रमाणे सर्जनात्मक विचार करावा लागेल. अशा विचारांची काही झलक तुमच्या घराची पुनर्बांधणी कारण्यासाठी तुम्हाला काेणताही खर्च न करता उपयुक्त ठरतील.
 
फर्निचरची पुनर्रचना : तुमच्या घराचा सध्याचा लूक आता तुम्हाला एवढा आवडत नाही असे तुम्हाला वाटत असल्यास तुम्ही लिव्हिंग रूम, बेडरूममधील फर्निचरची व्यवस्था किंवा रचना बदला. साेफा, खुर्च्या, बेड, डायनिंग सेट, साईड टेबल, रायटिंग टेबल, ड्रेसिंग टेबल आणि इतर फर्निचर तुमच्या आवडीनुसार पुन्हा व्यवस्थित करा. असे केल्याने, प्रत्येक खाेलीला एक नवीन लूक मिळेल आणि त्यासाेबतच तुम्हाला एक ताजी भावनाही जाणवेल!
 
फुले-राेपांची सजावट : तुम्ही घराच्या अंगणात एक लहानसा बगीचा तयार केला असेल किंवा कुंड्यांमध्ये फुलझाडे लावली असतील, तर दरराेज याच्या ताज्या फुलांची फुलदाणीमध्ये पानांसहित व्यवस्थित रचना करा. ही फुलदाणी बैठकीच्या खाेलीत, साईड टेबल किंवा डायनिंग टेबलावर ठेवा.कॅक्टस, बाेन्सायसारख्या शाेभेच्या वनस्पतीही ठेवा. यांसारख्या निसर्गाच्या छाेट्या प्रतीकांमुळेही घराचे वातावरण आनंदी हाेईल.
 
नीटनेटकेपणा - टापटीपतेचा आग्रह : पैसे खर्च न करता घराला नवीन लूक देण्याचा एक सर्वांत सामान्य मार्ग म्हणजे प्रत्येक खाेलीतील उपलब्ध जागा व्यवस्थित ठेवणे.सर्वकाही व्यवस्थित ठेवले पाहिजे. निटनेटकी मांडणी मनाला आनंदी ठेवेल. घराला स्वच्छ आणि नीटनेटके ठेवण्याच्या आग्रहाने त्याचे संपूर्ण बाह्य स्वरूप बदलून जाते. लिव्हिंग स्पेसच्या तंगीच्या काळात घरामध्ये अनावश्यक फर्निचर, इतर वस्तूंचा साठा करू नका. बाहेर ठेवण्याची गरज नाही अशा वस्तूंना कपाटात, इतर साठवणुकीच्या व्यवस्थेत ठेवा.थाेडक्यात, घराची प्रशस्तता राखा, मनाला खराेखरच शांती मिळेल! गॅलरी वाॅल तयार करा : कुटुंबातील सगळे सदस्य त्यांचा सर्वात जास्त वेळ ज्या खाेलीमध्ये घालवतात त्या खाेलीच्या एका भिंतीला वाॅल आर्ट, फाेटाे प्रिंट्स, कॅन्व्हास वाॅल आर्टवर्कस आणि इतर कलाकृतींनी सजवा. अशी गॅलरी वाॅल तयार करायला फारसा खर्च येत नाही. लाेविंग रम किंवा हाेम ऑफिसमध्ये अशी गॅलरी जास्त शाेभून दिसेल. दरराेजची कलेची थाेडीशी झलक देखील कंटाळवाणे जीवन उजळवू शकते.
 
सजावटीच्या वस्तूंची पुनर्रचना : घर किंवा एखाद्या खाेलीच्या सजावटी (स्टाइलिंग) साठी यापूर्वीच तुम्ही खर्च करून वाॅल आर्ट, टेबलावर ठेवायच्या कलात्मक वस्तू, पुस्तके, फुलदाण्या यांसारख्या शाेभेच्या चीजवस्तू खरेदी केल्या असतील तर फेरसजावटीमध्ये (रिस्टाइलिंग) याच वस्तूंना पूर्वीपेक्षाही जास्त आकर्षकपणे ठेवाव्यात. त्यामध्ये सुगंधित मेणबत्या, हाेम अ‍ॅक्वेरियम यांसारख्या मनाला आवडतील अशा वस्तू अ‍ॅड करता येतील. रिस्टाइलिंग सारख्या साेप्या फेरबदलांनी घराला मिळणारा नवा लूक आपल्यामध्ये नवीन उत्साह, आनंद आणि स्फूर्तीचा संचार करण्याबराेबरच विचार करण्याच्या आपल्या दृष्टिकाेनाला एक नवीन वळण देऊ शकताे. याचसाेबत, घर त्याचे अनेक आशीर्वाद टिकवून ठेवेल.