सत्ताधाऱ्यांनी संस्कृतीचे शहर पुण्याची ओळख गुंडांचे शहर अशी केली

    13-Jan-2026
Total Views |

Pune
 
पुण्याची ओळख एकेकाळी शिक्षणाचे, संस्कृतीचे शहर अशी हाेती. मात्र आज ते गुंडांचे शहर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. कुठून काेयता गँग येईल, याचा नेम नाही.त्यामुळे रस्त्यावर यायलाही भीती वाटू लागली आहे. सत्ताधाऱ्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लाेकांना तिकिटे दिली आहेत. गुंडगिरी, दादागिरीशिवाय सत्ताधारी पक्ष निवडणुका जिंकूच शकत नाही असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर केला. पुण्यातील जनता सुजाण असून मतदानातून ही गुंडगिरी गाडल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करीत भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी मशाल पेटवा, असे आवाहन त्यांनी केले.
 
बालाजीनगर- आंबेगावकात्रज प्रभाग क्रमांक 38 आणि काेंढवा बुद्रुक येवलेवाडी प्रभाग 40 मधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ आयाेजित जाहीर सभेत ते बाेलत हाेते. यावेळी राज्य संघटक वसंत माेरे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, पंकज जगताप, स्नेहल कामठे, रूपेश माेरे, कल्पना थाेरवे, प्रशांत बधे, गणेश कामठे, सुनील मांगडे, सुवर्णा पायगुडे, अस्मिता रानभरे, सुभाष घुले, संजय कामठे, अनिल परदेशी, मंगेश रासकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.पुण्यातल्या काेयत्याला राष्ट्रीय हत्यार म्हणून मान्यता दिली पाहिजे. ही परिस्थिती सत्ताधाऱ्यांच्या अपयशामुळे निर्माण झाली आहे.
 
गुन्हेगारीवर कठाेर कारवाई करण्याऐवजी गुंडांना,त्यांच्या नातेवाईकांना निवडणुकीची तिकिटे दिली आहेत. दाऊद किंवा छाेटा शकील भेटला असता तरी त्यांनाही तिकीट दिले असते. मात्र, अशा गुंडगिरी प्रवृत्तीशी लढण्याची शिवसेनेची जुनी परंपरा आहे. मुडदे पाडणारे, खंडणी मागणाऱ्यांना शिवसेनेने तिकिटे दिली नाहीत.तर, सामान्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्यांना तिकीटे दिली, असे राऊत यांनी सांगितले. सत्ताधारी भाजपला सत्तेचा माज आला असून लाेकसभा ते ग्रामपंचायतीपर्यंत त्यांनी आपली सत्ता हवी आहे.