नेदरलँडस्, 8 सप्टेंबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
अनंत चतुर्दशीच्या मंगलमय मुहूर्तावर शनिवारी (6 सप्टेंबर) नेदरलँड्स मराठी मंडळाच्या गणेशोत्सवाचा दशकपूर्ती सोहळा दिमाखात संपन्न झाला. संपूर्ण दिवसाच्या या अनोख्या कार्यक्रमात जवळजवळ पावणे चारशे लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक मिरवणुकीने झाली. ताज्या रंगीबेरंगी फुलांनी सजवलेल्या पालखीत गणपती बाप्पाची विलोभनीय मूर्ती उठून दिसत होती. वाद्यवृंदाच्या अग्रस्थानी ध्वज, ताल धरणारी झांज, जोश चढवणारा ढोल आणि विविध रचनांनी मिरवणूक संस्मरणीय करणारा ताशा, अशा लवाजम्यासह लहान मुलांचा बरची नृत्य करणारा चमू लक्षवेधी ठरला.
दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त हा उत्सवाचा समृद्ध वारसा नव्या पिढीकडे यशस्वीपणे सुपूर्द करण्यात आला. मिरवणुकीचा शेवट रिंगणाने करण्यात आला. त्यावेळी नाशिक ढोल, गरबा अशा प्रसिद्ध ठेक्यांवर नाचण्याचा मोह कोणालाही आवरता आला नाही. मिरवणुकीनंतर गणेशपूजन करण्यात आले. यावर्षीची आरास ही भारतीय सैन्यदलाच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ ह्या साहसी मोहिमेच्या धर्तीवर करण्यात आली होती. परदेशस्थ भारतीयांचा भारतीय सैन्यदलांना मानवंदना देण्याचा हा एक अनोखा उपक्रम होता. बाप्पाला खव्याच्या मोदकांचा नैवेद्य दाखवून सगळ्यांना प्रसाद देण्यात आला.
गणपती बाप्पा दिमाखात विराजमान झाल्यावर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून नेदरलँड्स इंडिया असोसिएशनचे अध्यक्ष देवपाल सिंह उपस्थित होते. बाप्पाचे पूजन व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. येथे पंजाबी, गुजराती, बंगाली, दक्षिण भारतीय अशा सर्व ठिकाणच्या खाद्यपदार्थांची रेलचेल होती.उत्सवाच्या निमित्ताने विद्यमान जागतिक परिस्थितीत असणारे भारताचे परराष्ट्रीय धोरण, या विषयावरील चर्चासत्रात उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे भाग घेत अनेक दृष्टिकोनातून आपले मुद्दे मांडले.
दरम्यान, लहान मुलांनी बाप्पाची प्रतिमा बनवण्याच्या कार्यशाळेत सहभाग घेतला. सोबतच, भांगडाच्या कार्यशाळेचाही उपस्थितांनी आनंद लुटला. त्याच बरोबर मोदक बनवण्याची व रांगोळी काढण्याची स्पर्धादेखील आयोजित करण्यात आली होती. विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात आबालवृद्धांनी उत्साहात सहभाग घेतला. विशेष म्हणजे यावर्षी शास्त्रीय, उपशास्त्रीय कलांचे सादरीकरण आणि नवीन पिढीने केलेले लोककलांचेही सादरीकरण पाहावयास मिळाले.
डॉ. नूपुर कोहली यांना रश्मिन मानपत्र
नेदरलँड्स मराठी मंडळाच्या गणेशोत्सवाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे रश्मिन मानपत्र. या रश्मिन मानपत्राने सामाजिक कार्यासाठी एका व्यक्तीचा किंवा एखाद्या संस्थेचा गौरव केला जातो. यावर्षी हा बहुमान डॉ. नूपुर कोहली यांना नेदरलँड्समधील त्यांच्या राजकीय व सामाजिक कार्यासाठी देण्यात आला