बोगस हरकती देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

    08-Sep-2025
Total Views |
 
 pu
पुणे, 7 सप्टेंबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 34 नऱ्हे-वडगाव बुद्रुकमध्ये बोगस हरकती दाखल करणाऱ्या राजकीय पक्षांच्या इच्छुक व त्यांच्या कार्यकर्त्यांवर निवडणूक आयोग निर्भय आचारसंहिता कायद्यानुसार तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करा, अशी मागणी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी केली आहे. या गंभीर प्रकाराबाबत आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर हे राज्य निवडणूक आयोगासह जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत.
 
याबाबत बेनकर यांनी सांगितले की, सत्ताधारी पक्षांच्या इच्छुक; तसेच नेत्यांच्या सांगण्यावरून काही कार्यकर्त्यांनी प्रभागरचनेबाबत जवळच्या लोकांच्या नावाने बोगस अर्ज हरकती दाखल केले आहेत. गुरुवारी (4 सप्टेंबर) नऱ्हे-वडगाव बुद्रुक प्रभागात एकाच दिवसात दीड हजार जणांनी हरकतीचे अर्ज दाखल केले.
 
आदर्श निवडणूक आचारसंहिता आणि निवडणूक आयोगाच्या आदेशाची या तथाकथित नेतेमंडळींनी पायमल्ली केली असून लोकशाहीवर घाला घातला आहे. आता केवळ प्रभागरचनेची प्रक्रिया सुरू आहे. यापुढे निवडणुका होईपर्यंत अनेक कायदेशीर प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून पार पडणार आहे. सध्याच्या बोगस हरकतींमुळे प्रत्येक प्रक्रियेत बोगस हरकती, नावे समाविष्ट करून तथाकथित नेतेमंडळी व त्यांचे समाजकंटक कार्यकर्ते निवडणूक आयोगाला पयार्याने भारतीय राज्यघटनेला वेठीस धरणार आहेत. त्यामुळे बोगस हरकती दाखल करणाऱ्यांची तातडीने चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी फौजदारी गुन्हे दाखल करावेत.