कोथरूड, 29 सप्टेंबर (आ.प्र.) ः
कोथरूडमधील जीत ग्राउंडमध्ये सुरू असलेल्या गरब्याच्या कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी थेट कार्यक्रमस्थळी पोहोचत हा कार्यक्रम बंद पाडला. तसेच या ठिकाणी आता पुन्हा हा कार्यक्रम होणार नाही, असेदेखील मेधा कुलकर्णी यांनी जाहीर करून टाकले. मात्र आता फक्त कोथरूडमधील कार्यक्रम थांबवून मेधा कुलकर्णी शांत बसणार नसून, आता पुढे संपूर्ण पुण्यामध्ये जनआंदोलन उभारणार असल्याचे सांगितले.
माध्यमांशी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या, त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या आवाजात गरब्याचा कार्यक्रम सुरू होता. ज्यामुळे घरातल्या वस्तू थरथरत होत्या, काचा थडथडत होत्या आणि दाराची कडी कडकड वाजत होती. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी मोठ्या आवाजात गाणी सुरू होती आणि धिंगाणा सुरू होता. ज्या पद्धतीची गाणी त्या ठिकाणी लावण्यात आली होती तीदेखील आक्षेपार्ह गाणी होती. असंख्य नागरिकांचे मला फोन आले. मी याबाबत पोलिसांना देखील कळवले. मात्र पोलिसांनी त्यावर वेळीच ॲक्शन घेतली नाही. त्यामुळे मी त्या ठिकाणी स्वतः जाण्याचा निर्णय घेतला. त्याबाबत मी पोलिसांना कळवले. पोलिसांनी आम्हीदेखील त्या ठिकाणी पोहोचत असल्याचे सांगितलं.
मात्र प्रत्यक्षात ते वेळेत पोहोचलेच नाहीत. ज्या अटी-शर्तीसह त्या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली होती, त्या अटीशर्तींचा भंग करून मोठ्या आवाजात तो कार्यक्रम सुरू होता. त्यामुळे तिथे जाऊन बंद पाडला. पोलिसांनी पुढे होऊन साहित्य जप्त करणे आवश्यक होते. मात्र तसे पोलिसांनी केले नाही, अशी नाराजी खासदार कुलकर्णी यांनी व्यक्त केली.