महावितरण महिला संघाला बॅडमिंटनमध्ये सुवर्ण

    30-Sep-2025
Total Views |
 
mah
 
पुणे, 29 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या 47 व्या राष्ट्रीय बॅडमिंटन-2025 स्पर्धेत महावितरणच्या महिला संघाने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकावले, तर पुरुष संघ कांस्यपदकाचा विजेता ठरला. महिला खेळाडूंनी दुहेरीत सुवर्ण, एकेरीत रौप्यपदक जिंकत राष्ट्रीय स्पर्धेत वर्चस्व गाजवले. या सर्व खेळाडूंचे महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी अभिनंदन केले आहे. हिस्सार (हरियाणा) येथे तीनदिवसीय 47 व्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचा नुकताच समारोप झाला. देशभरातील विविध वीज कंपन्यांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते.
 
महावितरणच्या महिला संघाने स्पर्धे त एकतर्फी वर्चस्व गाजवत अंतिम फेरीत गुजरात संघाला 2-0 ने पराभूत करत सलग दुसऱ्या सुवर्णपदकाचा मान मिळवला. महावितरणच्या रितिका नायडू (कर्णधार), अनिता कुलकर्णी, चैत्रा पै, वैष्णवी गांगरकर व राणी पानसरे या खेळाडूंनी ही कामगिरी केली. चैत्रा पै व रितिका नायडू यांनी दुहेरी गटात सुवर्णपदकाची, तर अनिता कुलकर्णी यांनी एकेरी गटात रौप्यपदकाची कमाई केली.
 
महावितरणच्या पुरुष संघातील भरत वशिष्ठ (कर्णधार), पंकज पाठक, रोहन पाटील, सुरेश जाधव, दीपक नाईकवाडे यांनी चुरशीच्या सामन्यांत उपांत्य फेरीपर्यंत धडक देत कांस्यपदक पटकावले. महावितरणच्या महिला व पुरुष बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक म्हणून गुणवंत इप्पर, तर संघ व्यवस्थापक म्हणून उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भूपेंद्र वाघमारे यांनी काम पाहिले.