लोकमान्यनगर येथील इमारतींच्या पुनर्विकासावरील स्थगिती उठवा

    30-Sep-2025
Total Views |
 
 lok
पुणे, 29 सप्टेंबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
लोकमान्यनगर येथील इमारतींच्या पुनर्विकासाला शासनाने दिलेली स्थगिती उठवावी, अशी मागणी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. धंगेकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, लोकमान्यनगर येथील म्हाडा वसाहत सन 1961 ते 62 च्या दरम्यान म्हणजे साधारणपणे साठ वर्षांपूर्वी पानशेत धरणाच्या पुरानंतर स्थापन करण्यात आली. या वसाहतीमध्ये सर्वसाधारण मध्यमवर्गीय नागरिक राहत असून, सद्य:स्थितीत सदर नागरिक हे अत्यंत दुरवस्था झालेल्या इमारतींमध्ये राहात आहेत.
 
या ठिकाणी 53 इमारती असून, सर्व इमारतींमधील नागरिकांनी नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केल्या आहेत. यातील काही गृहनिर्माण सहकारी संस्थांचा पुनर्विकास अंतिम टप्प्यात आला आहे. येथील इमारती अत्यंत जीर्ण झाल्या असून मूलभूत सोयी सुविधा देखील येथील नागरिकांना मिळत नाहीत. येथील इमारतींचा पुनर्विकास लवकरात लवकर झाल्यास नागरिकांची होणारी परवड थांबणार आहे.
 
परंतु, काही घटक एकात्मिक विकासाच्या नावाखाली या ठिकाणची जागा आणि पुनर्विकासात मिळणारा लाभ विचारात घेऊन येथील रहिवाशांनी सुरू केलेले पुनर्विकासाचे प्रयत्न हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. या घटकांनी शासनाची दिशाभूल करून एकात्म विकासाचा कुठलाही आराखडा नसताना देखील पुनर्विकासाला खीळ घातली आहे. शासनाने स्थानिक रहिवाशांची भावना विचारात घेऊन पुनर्विकासाला दिलेली स्थगिती तातडीने उठवावी व स्थानिक रहिवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी धंगेकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.