शिवाजीनगर, 27 सप्टेंबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) ः
शहरातील प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास अजूनही कागदावरच अडकलेला आहे. वर्ष 2018-19 च्या महापालिका बजेटमध्ये या पुनर्विकासाची घोषणा झाली होती, मात्र सहा वर्षांनंतरही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. महापालिका भवन निर्माण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या संदर्भात अनेक प्रस्ताव आले आहेत; पण काही लोकप्रतिनिधी व कलाकारांच्या विरोधामुळे हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला आहे. कलाकार, सामाजिक संस्था आणि विविध राजकीय पक्षांचा असा दावा आहे की प्रकल्पाची रूपरेखा, डिझाइन आणि नियोजन करताना जनतेचा सहभाग झाला नाही. त्यामुळे विरोध अद्याप कायम आहे. सभागृहामध्ये स्वच्छता आणि पार्किंगच्या गंभीर समस्या असल्याचे सतत निदर्शनास आले आहे.
अलीकडेच आर्ट गॅलरीतील फॉल्स सीलिंगचा एक भाग कोसळल्याने पुनर्विकासाबाबत चर्चेला पुन्हा गती मिळाली. आतापर्यंत 56 डिझाइनरांनी रस दाखवला असून, त्यातील 26 डिझाइन महापालिकेकडे सादर करण्यात आले आहेत. यापैकी आठ डिझाइन अंतिम सादरीकरणासाठी निवडण्यात आले आहेत. सांस्कृतिक कार्यकर्ते स्वप्नील नाईक म्हणाले, की पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हटले जाते. येथे असलेल्या सुविधा सर्वोत्तम असायला हव्यात; पण प्रशासन या बाबतीत गंभीर नाही. इव्हेंट आयोजक समीर हंपी म्हणाले, की बालगंधर्व रंगमंदिराला स्वच्छता आणि पार्किंगसारख्या मूलभूत समस्यांचा सामना करावा लागतो. भवन निर्माण विभागप्रमुख रोहिदास गव्हाणे म्हणाले, पर्याय शोधणे ही वेळखाऊ प्रक्रिया आहे.
सविस्तर प्रकल्प अहवाल, स्थलांतराचा खर्च आणि निधी यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. बालगंधर्व रंगमंदिरातील विद्यमान नाट्यगृह पाडून नव्या आकर्षक पद्धतीने पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. त्यामुळे पुनर्विकासाचा मुद्दा मागे पडला. मोठ्या हॉलसोबतच लहान लहान हॉल बांधण्याचा प्रस्ताव होता; परंतु पुनर्विकासासाठी लागणारा वेळ जास्त आहे तसेच ऐतिहासिक महत्त्व जपण्याची मागणी पुढे आली. त्यामुळे हा विषय सध्या अडगळीत गेला आहे. कलावंतांच्या दृष्टीने बालगंधर्व रंगमंदिर अत्यंत महत्त्वाचे असून, पुनर्विकासातील पेचामुळे भविष्यातील सांस्कृतिक उपक्रमांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.