कात्रज, 27 सप्टेंबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) ः
कात्रज डेअरी अर्थात पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाकडून शेतकऱ्यांना दोन रुपये दूध फरक जाहीर करण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या 66व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला. संस्था प्रतिनिधींनी मांडलेल्या मागणीनुसार हा दरफरक देण्याची घोषणा संचालक मंडळाकडून करण्यात आली. या प्रसंगी आमदार शंकर मांडेकर, माजी आमदार अतुल बेनके, संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्नील ढमढेरे, संचालक मंडळ व मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. पवार म्हणाले, ‘दुधातील होत असलेली भेसळ थांबविण्यासाठी शासन ठोस निर्णय घेईल. दुधातील भेसळ रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी झाली असून, शासन त्यावर ठोस निर्णय घेईल.
भाकड जनावरांचा प्रश्न सोडविण्यासाठी तो मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल. कात्रज डेअरीचा नवीन संपूर्ण स्वयंचलित प्रकल्प डिजिटल पद्धतीने सुरू झाला आहे, यामुळे गुणवत्तापूर्ण उत्पादनाला चालना मिळेल.’ संघासाठी पूर्वी मिळू न शकलेली 1.5 हजार कोटींची जागा सत्तेत असल्याने मिळविण्यात यश आले आहे. चाकण परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात तेथील महापालिका झाल्यास आश्चर्य वाटू देऊ नये. मार्केट यार्ड कमिटीमध्ये जागेची मागणी मान्य झाली असल्याचेही पवार यांनी सांगितले. कार्यक्रमात पवार यांच्या हस्ते नवीन स्वयंचलित दूध व दुग्धजन्य पदार्थ प्रकल्प, दूध व दुग्धजन्य पदार्थ मिनी मॉल, कात्रज डेअरी प्रॉडक्ट रिब्रँडिंग, ईशान्वी हनी व ॲग्रीकल्चर ड्रोन यांचे डिजिटल पद्धतीने उद्घाटन करण्यात आले.
अध्यक्ष ढमढेरे यांनी वार्षिक अहवाल सादर करताना 2024-25 मध्ये संघाची उलाढाल 381 कोटी रुपयांची झाल्याचे नमूद करत 2 कोटी 60 लाखांचा निव्वळ नफा झाल्याचे सांगितले. सभेत व्यापारी पत्रक, नफा-तोटा पत्रक, नफा वाटप, वार्षिक अहवाल, नवीन दूध उत्पादने निर्माण करण्यासाठी आधुनिक मशिनरीसह प्लांट उभारणी, नवीन प्रशासकीय इमारत बांधणी, लेखा परीक्षकांची नेमणूक यांसह विविध ठरावांना मंजुरी देण्यात आली. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 16 आदर्श दूध संस्थांना; तसेच सर्वाधिक दूधपुरवठा, उच्च गुणवत्तेचे दूध उत्पादन व पशुखाद्य विक्रीत आघाडी घेतलेल्या एकूण 17 संस्थांना प्रशस्तिपत्रक, सन्मानचिन्ह व पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सभेच्या शेवटी संचालक गोपाळराव म्हस्के यांनी आभार मानले, तर जितेंद्र देवकर यांनी सूत्रसंचालन केले.
पवारांकडून बारामतीच्या संघासोबत तुलना
अजित पवार यांनी बोलताना बारामती तालुका दूध संघासोबत कात्रजची तुलना करत दूध संकलन वाढविण्यावर भर देण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. पवार म्हणाले, ‘बारामती तालुका दूध संघ एका तालुक्यातून 2 लाख 65 हजार लिटर दूध संकलन करतो, तर कात्रज दूध संघ 11 तालुक्यांतून केवळ 1 लाख 90 हजार लिटरपर्यंत खाली आला आहे. हे गणित योग्य नसून कात्रजनेही संकलनात वाढ करून स्पर्धेला सामोरे जाण्याची गरज आहे.’