कचरा वेचकाचा प्रामाणिकपणा :2 लाख 90 हजारांची बॅग परत दिली

    29-Sep-2025
Total Views |
 
 kac
पुणे, 27 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
स्वच्छ सहकारी संस्थेच्या सभासद बायडा गायकवाड गेल्या 20 वर्षांपासून सनसिटी परिसरात दारोदार कचरा संकलनाचे काम करत आहेत. 24 सप्टेंबर रोजी नियमित कामकाजादरम्यान त्यांच्या ढकलगाडीत एक बॅग सापडली. सुरुवातीला ती कपड्यांची पिशवी आहे असे समजून त्यांनी सॉर्टिंग सुरू केले असता, त्यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम असल्याचे लक्षात आले. तत्काळ बायडा गायकवाड यांनी सहकारी दत्ता वाघमारे आणि दीपाली वाघमारे यांच्या मदतीने पॅराडाईस-2 सोसायटीचे चेअरमन अजित टिंबे यांच्याशी संपर्क साधला. या तिघांनी ती बॅग थेट पोलिसांकडे सुपूर्त केली.
 
दुपारच्या वेळी स्क्रॅप वर्गीकरण करत असताना हेमंत माद्रीकर काहीतरी शोधत असल्याचे बायडा गायकवाड यांच्या निदर्शनास आले. चौकशीअंती त्यांनी हरवलेली बॅग शोधत असल्याचे समजले. त्यावेळी बायडा गायकवाड यांनी बॅग पोलिसांकडे दिल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी ती बॅग मूळ मालक हेमंत माद्रीकर यांच्याकडे परत दिली. बॅगमध्ये तब्बल 2,90,420/- इतकी रक्कम जशीच्या तशी असल्याचे माद्रीकर यांनी पाहिले. बायडा गायकवाड यांच्या या प्रामाणिकपणाने प्रभावित होऊन त्यांनी 3,000/-रुपये त्यांना बक्षीस म्हणून दिले.