पुणे, 27 सप्टेंबर (प्रतिनिधी) :
शिवीगाळ, धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी देत अपमानित केल्याप्रकरणी पुणे बाजार समितीचे सभापती, सचिव यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची तक्रार स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे. याप्रकरणी सुहास बनसोडे यांनी बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, सचिव डॉ. राजाराम धोंडकर आणि अन्य लोकांविरुद्ध स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. बनसोडे यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते गुरुवारी (25 सप्टेंबर) पत्रकार या नात्याने बाजार समितीच्या सचिव कार्यालयात वृत्तांकनासाठी गेले असता हा प्रकार घडला.
सचिव राजाराम धोंडकर व सभापती प्रकाश जगताप यांच्या उपस्थितीत संचालक अनिरुद्ध भोसले यांनी आणलेल्या 20 ते 25 जणांच्या गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ केली आणि धमक्या दिल्या. हे सरकारी कार्यालय असून, मी पत्रकार म्हणून व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होतो. मात्र, मला गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी धमकावले. तसेच, मी अनुसूचित जातीमधील असल्याचे माहिती असूनही जाणूनबुजून माझा अपमान करण्यात आला. त्यामुळे सभापती, सचिव आणि इतरांवर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी बनसोडे यांनी केली असून, या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करून सत्यता तपासावी, अशी मागणीही त्यांनी पोलिसांकडे केली आहे. स्वारगेट पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
बाजार समितीचीही तक्रार ः
लवांडे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सचिवांच्या दालनात जाऊन संचालक संतोष नांगरे, अनिरुद्ध भोसले, गणेश घुले व सभापती यांना शिवीगाळ करण्याची धमकी देण्यात आली. तसेच, आक्षेपार्ह भाषा वापरली व बाजार समितीच्या कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी बाजार समितीनेदेखील स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
शेतकरी संघटनेचीही तक्रार :
शेतकरी प्रश्नी बाजार समिती विरोधात अनेकवेळा उपोषण, आंदोलने केली आहेत. गुरुवारी समितीत गेलो असता सभापती प्रकाश चंद्रकांत जगताप आणि काही संचालक मंडळाचे सदस्य यांनी मला व माझ्या कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिली. माझ्या किंवा कुटुंबाच्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास याला सभापती जबाबदार असतील. याप्रकरणी सभापती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सूर्यकांत काळभोर यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये केली.