कोंढव्यात स्वच्छ पाणी द्या; अन्यथा आंदोलन करणार

    27-Sep-2025
Total Views |
 
 kod
 
पुणे, 26 सप्टेंबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
कोंढवा परिसरातील अजमेरा पार्क, ग्रीन पार्क, रॉयल पार्क व अश्रफ नगर या भागातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून कमी दाबानेच येते असे नाही, तर त्यात ड्रेनेजचे पाणी मिसळून नागरिकांना आरोग्याच्या भयंकर संकटाला तोंड द्यावे लागत आहे. येथील नागरिकांना शुद्ध आणि पुरेशा दाबाने पाणी मिळावे यासाठी महापालिकेने तातडीने पावले उचलावीत; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.
 
मनसेचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेत यासंदर्भात निवेदन दिले. त्यामध्ये महानगरपालिकेने पाण्याच्या समस्येकडे आजवर केलेले दुर्लक्ष हे नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेणारे आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी केल्या, निवेदने दिली, तरीसुद्धा प्रशासनाने याकडे काणाडोळाच केला आहे. हे नाकारणार नाही की पुणे महानगरपालिका ज्या जोमाने, ज्या ताकदीने आणि ज्या पद्धतीने मालमत्ता कर, विविध कर आणि दंड वसूल करण्यासाठी उत्साह दाखवते, त्याच जोमाने नागरिकांच्या पाणीपुरवठ्याच्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष का देत नाही?
 
नागरिकांकडून कर वसूल करताना प्रशासनास कोणतीही अडचण वाटत नाही, मग त्याच नागरिकांना जगण्यासाठी लागणारे शुद्ध पाणी देताना महापालिका मौन का बाळगते? हे नागरिकांसोबतचे उघड अन्यायकारक वर्तन आहे. नागरिकांना त्यांच्या पैशाचा, कराचा, अधिकाराचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. पाणी हा माणसाचा प्राथमिक हक्क आहे. पुण्यासारख्या शहरात 2025 मध्ये सुद्धा नागरिकांना दूषित व अपुरा पाणीपुरवठा सहन करावा लागणे हे अत्यंत लाजिरवाणे व प्रशासनाच्या अपयशाचे स्पष्ट निदर्शक आहे. नागरिकांचा संयम आता संपत आला आहे.