कात्रज डेअरीची क्षमता दुप्पट वाढवणार : स्वप्नील ढमढेरे

    27-Sep-2025
Total Views |
 
kat 
पुणे, 26 सप्टेंबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क ) :
 
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कात्रज मुख्यालयातील जमिनीवर डेअरी विस्तारीकरणाचा अत्याधुनिक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे संघाच्या आत्ताच्या दीड लाख लिटर प्रकल्पाची क्षमता दुपटीने वाढून तीन लाख लिटर होणार आहे. दीड वर्षांत हा प्रकल्प सुरू करण्याचे संघाचे नियोजन आहे. राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाच्या (एनडीडीबी) अर्थसाह्यातून व त्यांच्या माध्यमातून डेअरी विस्तारीकरणाचा अत्याधुनिक प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यास संचालक मंडळाच्या बैठकीत पूर्वीच मान्यता मिळाली आहे.
 
संघाच्या या जमिनीवर महापालिकेचे बहुउद्देशीय कामांसाठीचे आरक्षणही रद्द झाल्याने आता मूळ डेअरी विस्तारीकरण प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. संस्थेत नवीन संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर या प्रकल्पाला चालना देण्यात आली आहे. दीड वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्नील ढमढेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‌‘दूध संकलन, त्यावर प्रक्रिया आणि ते पिशवीबंद करण्याची प्रक्रिया पूर्ण स्वयंचलित पद्धतीने होणार आहे. येथील मनुष्यबळ इतर विभागासाठी वापरले जाणार आहे. जुनी यंत्रणा साठवणूक आणि अतिरिक्त मागणीवेळ उपयोगात आणली जाणार आहे,‌’ असे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी सांगितले.
 
दूध उत्पादक आणि शेतकरी यांना केंद्रबिंदू मानून आणि सर्व संचालकांच्या सहकार्याने संघाच्या हिताला प्राधान्य दिल्याने आर्थिक वर्ष 2024-25 या आर्थिक वर्षांत संघाची 381 कोटींची उलाढाल झाली असून, दोन कोटी साठ लाख रुपयांचा नफा झाला आहे. 691.18 लाख लिटर गाईचे दूध आणि 42.81 लाख लिटर म्हशीचे दूध असे एकूण 733.99 लाख लिटर दुधाचे संकलन झाले आहे. वाढते शहरीकरण, सहकारी व खासगी दूध संघ वाढल्याने निर्माण झालेली स्पर्धा, तसेच गुणवत्तेवर भर दिला जात असल्याने 40 लाख लिटर दूध संकलन घटले आहे. मात्र, अत्याधुनिक प्रकल्पासाठी दूध संकलन वाढविण्यात येणार आहे, असे स्वप्नील ढमढेरे यांनी सांगितले.
 
जीएसटीच्या नवीन कररचनेत आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच टप्पे लागू करण्यात आले आहेत. या बदलामुळे दैनंदिन उपयोगातील पनीर, तूप, बटर, आइसक्रीम हे पदार्थ स्वस्त झाले आहेत. सध्या दुग्धजन्य पदार्थ म्हणून सर्वाधिक खप असलेला पदार्थ म्हणून पनीरची ओळख आहे. पनीर किलोमागे 20 रुपयांनी स्वस्त झाले आहे. लहानथोरांच्या आवडीचे आइसक्रीमही एका लिटरमागे 20 रुपयांनी स्वस्त झाले आहे. ‌‘दुग्धजन्य पदार्थांचे दर कमी झाल्यामुळे याचा थेट फायदा मागणी आणि वितरणामध्ये होणार आहे. ग्राहकांना कमी दरांत दुग्धजन्य पदार्थ मिळणार आहेत. किंमती कमी झाल्याने, तसेच सण-उत्सवामुळे दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे,‌’ असे पुणे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्नील ढमढेरे यांनी सांगितले.
 
सध्याची यंत्रणा साठ वर्षांपूर्वीची आहे. नवीन तंत्रज्ञान आल्याने प्रकल्पात बदल करण्याची आवश्यकता आहे. सध्या दूध, दही, ताक, तूप आणि इतर उपपदार्थांचे एकूण संकलन दीड लाख लिटर असून नवीन प्रकल्पामुळे ते दुपटीने वाढणार आहे. पाच एकर जागेवरील या प्रकल्पासाठी शंभर कोटींचा निधी लागणार असून 80 टक्के कर्ज मिळविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
-ॲड. स्वप्नील ढमढेरे, अध्यक्ष (पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ)