मुंबई, 25 सप्टेंबर (आ.प्र.) :
महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील सर्व औद्योगिक, व्यावसायिक, घरगुती व इतर ग्राहकांच्या 157 केडब्लूपर्यंत वीजभार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना महावितरणने स्वयंचलित पद्धतीने मंजुरी देण्यास प्रारंभ कला आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर ही स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे पायाभूत यंत्रणा उभारण्याची गरज नाही अशा ठिकाणी ग्राहकांनी नियमानुसार शुल्काचा भरणा केल्यानंतर केवळ 24 ते 48 तासांत मागणीप्रमाणे वाढीव वीजभार स्वयंचलित पद्धतीने मंजूर व कार्यान्वित होणार आहे. सध्या अस्तित्त्वात असलेल्या जोडणीच्या वीजभारात (Load Change/ Demand Change) करारापेक्षा आणखी वाढ करणे किंवा कमी करण्याची सोय महावितरणच्या www.mahadiscom. in संकेतस्थळावर किंवा मोबाइल ॲपवर ग्राहकांना स्वतःच्या लॉगीनद्वारे उपलब्ध आहे.
मात्र, मंजुरीची प्रक्रिया स्वयंचलित नसल्याने पुढील कार्यवाहीसाठी बराच वेळ लागत होता. आता 157 किलोवॉटपर्यंतच्या वीजभाराच्या वाढीसाठी स्वयंचलित मंजुरी देण्यात येणार आहे. वीजभार वाढीबाबत ऑनलाइन मागणी नोंदवल्यानतंर संबंधित ग्राहकांना स्वयंचलित पद्धतीने कोटेशन देण्यात येईल. कोटेशनचे शुल्क भरण्याचीही ऑनलाइन सोय आहे. लघुदाब वर्गवारीत शून्य ते 7.5 किलोवॉट, 7.5 ते 20 किलोवॉट आणि 20 ते 157 किलोवॉट असे वीजभाराचे तीन गट आहेत. या तिन्ही गटात वीजभार वाढीच्या मंजुरीसाठी स्वयंचलित प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.