कल्याण, 24 सप्टेंबर (आ.प्र.) :
महावितरणच्या कल्याण ग्रामीण विभागात येणाऱ्या टिटवाळा, इंदिरा नगर, गणेश वाडी, बल्लाणी परिसरात अनधिकृतपणे, तसेच सर्व्हिस वायरमध्ये छेडछाड करून वीज वापर करणाऱ्या 25 वीज चोरांना महावितरणने दणका दिला. या वीज चोरांनी 5.12 लाख रुपयांची वीज चोरी केली असून, वीज चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण ग्रामीण विभागात येणाऱ्या बल्लाणी, इंदिरा नगर, गणेश वाडी, टिटवाळा परिसरात मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याची माहिती महावितरणला मिळाली होती.
टिटवाळा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता गणेश पवार यांनी पथक तयार करून वीज मीटर तपासणी मोहीम हाती घेतली. वीज चोरी करणाऱ्या व्यक्ती मीटर असूनही देखील वीज चोरी करत असल्याचे आढळून आले. काही जण सर्व्हिस वायरमध्ये छेडछाड करून अनधिकृतपणे वीज वापर करत असल्याचे आढळून आले. महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील मांडा ग्रामीण शाखा कार्यालयांतर्गत 25 ठिकाणी वीज चोरी होत असल्याचे आढळून आले. महावितरणकडून वीज चोरीचे मूल्यांकन केले असता वीज चोरांनी 23017 युनिट वीज चोरी केल्याचे आढळून आले. याचे मूल्यांकन 5 लाख 12 हजार रुपये आहे. यासंदर्भात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.