पुणे, 23 सप्टेंबर (आ.प्र.) :
राज्य सरकारच्या वतीने मुख्याधिकारी गट अ संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे महापालिकेत यामध्ये दोन उपायुक्त आणि एक सहायक आयुक्त यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी हे आदेश नुकतेच जारी केले आहेत. तसेच ही नियुक्ती फक्त 2 वर्षांसाठी अथवा पुणे महापालिकेतील अधिकारी पदोन्नतीने उपलब्ध होईपर्यंत असणार आहे.
सोलापूर महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त म्हणून काम पाहणाऱ्या रवी पवार यांची प्रशासकीय कारणास्तव पुणे महापालिकेत उपायुक्त या पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. रवी पवार हे मुख्याधिकारी गट अ संवर्गातील आहेत. तसेच फलटण नगरपरिषदमध्ये मुख्याधिकारी म्हणून काम करणारे निखिल मोरे यांची पुणे महापालिकेत उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली, तर इगतपुरीचे मुख्याधिकारी पदावर काम पाहणाऱ्या सोमनाथ आढाव यांची पुणे महापालिकेत सहायक आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.