पुणे, 21 सप्टेंबर (आ.प्र.) :
विद्युत सहायकपदी निवड झालेल्या उमेदवारांना महावितरणने अनुसूचित जाती कल्याण समितीचे प्रमुख तथा आमदार नारायण कुचे व समितीच्या इतर सदस्यांच्या उपस्थित नियुक्तीपत्रे प्रदान केली. पुणे महापालिका सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात मागासवर्गीय 56 उमेदवारांना समितीच्या हस्ते नियुक्ती आदेश देण्यात आले. महावितरणने निर्देशाचे तातडीने पालन केल्याबद्दल समितीने महावितरणचे कौतुक केले. नवीन भरती प्रक्रियेतील उमेदवारांना तातडीने नियुक्त्या द्याव्यात, अशी सूचना केल्यानंतर महावितरणने 24 तासांत तत्परतेने सर्व उमेदवारांना नियुक्त्या दिल्या.
पुणे परिमंडलात निवड झालेल्या 281 पैकी 56 उमेदवार अनुसूचित जातीचे आहेत. ही सर्व सामान्य कुटुंबातील मुले-मुली आहेत. या मुलांनी आता संधीचे सोने करावे, असे आवाहन कुचे यांनी केले. इतर विभागांनीही अशीच तत्परता दाखवावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. समिती सदस्य तथा आमदार अमित गोरखे यांनीही महावितरणच्या तत्परतेचे कौतुक केले. विधानसभेने नियुक्त केलेली अनुसूचित जाती कल्याण समिती पुणे दौऱ्यावर आहे.
या दौऱ्यात शासनाच्या विविध विभागांकडून अनुसूचित जातींसाठी राबवलेल्या योजनांचा व नोकरभरतीचा आढावा ही समिती घेत आहे. आमदार सर्वश्री भीमराव केराम, तान्हाजी मुटकुळे, अशोक माने, शाम खोडे, मंगेश कुडाळकर, नरेंद्र भोंडेकर, संजय बनसोडे, सचिन पाटील, गजानन लवटे, संजय मेश्राम, अमोल मिटकरी, डॉ. प्रज्ञा सातव, जगन्नाथ अभ्यंकर यांचा या समितीत समावेश आहे. या कार्यक्रमाला महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर व युवराज जरग, सहायक महाव्यवस्थापक (मासं) सत्यजित राजेशिर्के यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.