प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पुस्तकाचे गाव, वाचनालये निर्माण व्हावीत : विश्वास पाटील

    19-Sep-2025
Total Views |
 ff
 
 
पुणे, 18 सप्टेंबर (आ.प्र.) :
 
मराठी माणूस नोकरीनिमित्त परप्रांतात गेल्यानंतर तेथील स्थानिक भाषा शिकण्यास प्राधान्य देतो, परंतु मुंबईत राहून अमराठी माणूस मराठी शिकणार नाही असा दुराग्रह बाळगतो, मराठी भाषेला मुंबईमध्ये अनेक वर्षे विरोधच होत आहे हे अयोग्य आहे, अशी टीका सातारा येथे होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ‌‘पानिपत‌’कार वेिशास पाटील यांनी केली. पुस्तकाचे एकच गाव आणि सगळीकडे जाहिरात अशा उपरोधिक स्वरात भाष्य करून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पुस्तकाचे गाव, वाचनालये निर्माण व्हावीत, माय मराठीची भवने बांधावीत असे आग्रही मतही त्यांनी व्यक्त केले.
 
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या संस्थांतर्फे सातारा येथे होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक वेिशास पाटील यांचा बुधवारी (दि. 16) जाहीर सत्कार करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना पाटील बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, प्रा. मिलिंद जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
शाल, हार आणि सातारी कंदी पेढा भरवून सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रा. मिलिंद जोशी यांनी पाटील यांचा सत्कार केला. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याचा आनंद व्यक्त करून वेिशास पाटील म्हणाले, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मी कधीच व्याकुळ नव्हतो. 2009साली मला अध्यक्षपदाची संधी चालून आली होती, मात्र मी ‌‘माझे वय लिहायचे आहे‌’ असे सांगून ती नाकारली. अध्यक्षपदावरून बोलताना रावसाहेब कसबे म्हणाले, साहित्य संमेलन हा एक आनंदोत्सव असावा. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून युवा पिढीला तुम्हीही लिहू शकता असा वेिशास देणे आवश्यक आहे. लिहिणे ही कुणा एका जाती-धर्म-लिंगाची मक्तेदारी नाही.
 
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, वेिशास पाटील हे असत्याची पेरणी होणाऱ्या काळातील सत्याची पेरणी करणारे साहित्यिक आहेत. आपल्या साहित्य निर्मितीसाठी त्यांनी देशाचाच नव्हे तर जगाचा नकाशा धुंडाळला आहे. ते अभिजन आणि बहुजनांचेही लेखक आहेत. प्रास्ताविकात प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, वेिशास पाटील यांची लेखणी इतिहास आणि वर्तमानालाही स्पर्श करणारी आहे. त्यांच्याकडे अव्वल दर्जाची प्रतिभा आहे. ते उथळ पाण्यात रमणारे नाहीत तर अथांग सागराची ओढ असणारे प्रतिभावान साहित्यिक आहेत. राजहंस प्रकाशनाचे डॉ. सदानंद बोरसे म्हणाले, वेिशास पाटील फक्त शब्दातून कारागिरी करणारे साहित्यिक नसून पुस्तके, कादंबऱ्यांमधील परिसर, पात्रे, माणसे यांच्याशी नाळ जुळलेला लेखक आहेत. सुनीताराजे पवार यांनी वेिशास पाटील यांचा परिचय करून दिला, तर सूत्रसंचालन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह अंजली कुलकर्णी यांनी केले. आभार विनोद कुलकर्णी यांनी मानले.