पुणे, 18 सप्टेंबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
पालिकेच्या बालगंधर्व रंगमंदिरातील सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच नाटकांसाठी आलेल्या प्रेक्षकांना पार्किंगसाठी जागा मिळत नसल्याच्या तक्रारी होत असताना घोले रस्त्यावरील एका हॉटेलच्या गाड्यांसाठी ठेकेदाराने चक्क पार्किंग जागा भाड्याने दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर ही बाब उघड झाली आहे. याच भागातील एका मोठ्या बांधकाम व्यावसायिकाने पार्किंग चालविण्यास घेतले असल्याने येथे त्यांच्याही गाड्या पार्क होत असाव्यात. बालगंधर्व रंगमंदिर मध्यवर्ती भागात असल्याने पालिकेचे सर्वाधिक कार्यक्रम येथे होतात. तसेच वर्षभर वर्दळ असलेले नाट्यगृह आहे.
या ठिकाणी नाटक, लावणी यासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. तसेच राजकीय, सामाजिक कार्यक्रमांमुळेही बालगंधर्व नेहमी हाऊसफुल्ल असते. कार्यक्रमासाठी शेकडो नागरिक येतात. त्यांना दुचाकी व चारचाकी लावण्यासाठी रंगमंदिराच्या आवारात जागा आहे. गेली चारपाच वर्षे पार्किंग मोफत होते. काही महिन्यांपूर्वी पालिकेने एका बांधकाम व्यावसायिकास पार्किंगचा ठेका दिल्याने नागरिकांना सशुल्क पार्किंग दिले जाते. पार्किंगमध्ये रंगमंदिरात येणाऱ्या रसिकांना, नाट्यसंस्था, कलाकारांच्या गाड्यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. मात्र, हे डावलून घोले रस्त्यावरील हॉटेलच्या ग्राहकांच्या चारचाकी येथे लावल्या जातात. बालगंधर्वमध्ये कार्यक्रम नसला तरी पार्किंगमध्ये कायम गाड्या दिसतात.
कार्यक्रम असेल तर नागरिक, कलाकार, नाट्यसंस्थांना वाहने लावण्यासाठी जागा नसते. पालिकेने बजावली नोटीस हा प्रकार समोर आल्यानंतर पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दखल घेत कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर सांस्कृतिक विभागाचे उपायुक्त सुनील बल्लाळ यांनी तत्काळ ठेकेदारास नोटीस बजावली आहे. बालगंधर्वचे मोफत असलेले पार्किंग ठेकेदाराला चालविण्यासाठी दिल्यावर आता ते हॉटेलचे पार्किंग होत असल्याचे व्हिडिओतून दिसते. पालिकेने बजावलेल्या नोटीसवर समाधानकारक खुलासा आली नाही तर ठेका रद्द होईल, असे बल्लाळ यांनी सांगितले.
व्हायरल व्हिडिओ याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात हॉटेलचा कर्मचारी गाडी पार्क करण्यासाठी आला असता त्याने संबंधित जागा हॉटेलसाठी असल्याचे सांगितले. त्याने नाट्यसंस्थेच्या कर्मचाऱ्याला गाडी काढण्यास सांगितले. नाट्यसंस्थेच्या कर्मचाऱ्याने गाडी काढणार नसल्याचे सांगत, हॉटेलच्या पार्किंगबद्दल विचारले असता हे हॉटेलचे पार्किंग आहे, आम्ही पार्किंग विकत घेतल्याचे सांगितले. कागदपत्र पाहिजे असतील तर हॉटेलवर जा, असे सुनावले.