जिल्ह्यातील किनाऱ्यांवर वाहनांना बंदी: दापाेली पाेलीस प्रशासनाचा निर्णय

    18-Sep-2025
Total Views |
 
 

dapoli 
दापाेली तालुक्यातील कर्दे समुद्र किनाऱ्यावर स्टंटबाजी करताना चारचाकी उलटून अपघात झाल्याच्या घटनेची जिल्हा पाेलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. समुद्र किनाऱ्यावर असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी पाेलिसांनी जिल्ह्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर वाहनांना जाण्यास बंदी घातली आहे.त्याची अंमलबजावणीही तातडीने करत समुद्र किनाऱ्यावर जाणारे मार्ग बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आले आहेत.पर्यटकांकडून समुद्र किनाऱ्यावर भरधाव वाहन चालवून स्टंटबाजीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे गाड्या समुद्र किनाऱ्यावरील वाळूत फसणे, भरतीच्या पाण्यात वाहन अडकून पडणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.गतवर्षी दापाेली तालुक्यात मुरुड, हर्णे आणि रत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनाऱ्यावर असे प्रकार घडले हाेते.
 
काही अतिउत्साही पर्यटक जबरदस्तीने वाहने समुद्र किनाऱ्यावर नेऊन भरधाव पळवण्याची स्टंटबाजी करतात. त्यामुळे अपघाताचा धाेका असताे. त्याचबराेबर इतरांच्या जीवावरही बेतण्याची शक्यता असते.जिल्हा पाेलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी जिल्ह्यातील सर्व समुद्र किनाऱ्यांवर वाहने नेण्यास बंदी घातली आहे. त्यासाठी किनाऱ्यांवर जाणारे रस्ते बॅरिकेट्सने बंद करण्यात आले आहेत.त्यामुळे आता किनाऱ्यावर वाहन नेऊन हुल्लडबाजी करणे, स्टंटबाजी करणाऱ्या वाहनचालकांना चाप बसणार आहे.रत्नागिरी तालुक्यातील आरे, काजीरभाटी, गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यांवर जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. दापाेलीतील मुरुड, कर्दे, लाडघर येथील रस्तेही बंद करण्यात आले आहेत.