शासनाच्या दादागिरीमुळे अनेक प्रकल्प रखडले

    10-Sep-2025
Total Views |
 
sha
 
पुणे, 9 सप्टेंबर
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
शासनाच्या विविध विभागांमुळे महापालिकेचे अनेक नागरी प्रश्न अडकलेले आहेत. या विभागांच्या दादागिरीमुळे लागणाऱ्या विलंबाबाबत राज्य शासनाकडे तक्रार करणार असल्याची भूमिका महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी घेतली आहे. महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या विविध प्रकल्पांचा मासिक आढावा सोमवारी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी घेतला. या आढाव्यामध्ये विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभाग, पोलीस प्रशासन, कृषी, वन अशा विविध शासनाच्या विभागांमुळे अनेक प्रकल्प अडकले असल्याचे अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.
 
 sha 
 
प्रकल्प सुरू झाल्यानंतर या अडचणी सोडविण्यास विलंब लागत असल्यामुळे प्रकल्पांचा खर्च वाढतो आणि शहरात नागरी प्रश्न निर्माण होतात, असे निदर्शनास आले आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देणे ही प्राथमिक आणि अत्यंत महत्त्वाची भूमिका महापालिकेची असते; परंतु शासनाच्या विविध विभागांकडूनच दादागिरी करण्यात येते. याबाबत शासनाकडे तक्रार करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
 
कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम लवकरच पूर्ण
कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तूर्तास पन्नास मीटर रुंदीचा रस्ता करण्यासाठी लागणारी जमीन ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात 470 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. पुढील महिनाभरात रस्ता रुंदीकरणावरील आक्षेप पूर्ण करून जून 2026 अखेर कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण केले जाईल. यासोबतच चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील मीटरच्या कामाला होणाऱ्या विरोधाबाबत नागरिकांशी संवाद साधण्यात येत असून, मीटरच्या कामालाही गती देण्यात आली आहे. येत्या मार्चअखेर या योजनेचे काम पूर्ण होईल. जायका कंपनीच्या सहकार्याने सुरू असलेल्या नदी सुधार योजनेतील पाच एसटीपींचे काम येत्या जानेवारीपूर्वी होईल. उरलेल्या चार एसटीपींचे काम मार्च 2026 अखेर होईल. उर्वरित दोन एसटीपींच्या कामांना मात्र जागेच्या विलंबाने भूसंपादनामुळे उशीर होईल, असे नवलकिशोर राम यांनी नमूद केले.