पिंपरी, 9 सप्टेंबर (आ.प्र.) :
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध झाली आहे. महापालिका निवडणूक लोकसभा व विधानसभा निवडणुकीप्रमाणे महायुती आणि महाविकास आघाडी अशी होणार की स्वतंत्रपणे लढली जाणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे, तर आरक्षण सोडतीत प्रभाग सुटणार की अडचण होणार, यावरून अनेकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. चारसदस्यीय 32 प्रभागांची प्रारूप रचना 22 ऑगस्टला प्रसिद्ध झाली आहे. निवडणुकीचा बार दिवाळीनंतर उडणार आहे. निवडणूक युती की आघाडी अशी होणार जाणार, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.
लोकसभा व विधानसभेप्रमाणे युती व आघाडीत निवडणूक होईल का, याबाबत पक्षश्रेष्ठींकडे सातत्याने विचारणा केली जात आहे. महापालिकेत भाजपचे सर्वाधिक 77 माजी नगरसेवक होते, तर एकत्र राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसचे 39 माजी नगरसेवक होते. एकत्रित शिवसेनेचे 9 माजी नगरसेवक इतकी ताकद होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन स्वतंत्र पक्ष होऊन माजी नगरसेवक विभागले गेले. भाजपच्या काही माजी नगरसेवकांनी पक्षाला राम राम केला आणि दुसऱ्या पक्षाची वाट धरली आहे. राज्यातील भाजपसह शिवसेना व राष्ट्रवादी महायुतीची सत्ता असल्याने माजी नगरसेवकांसह इच्छुकांची भाजपकडे जास्त ओढ असल्याचा दावा करण्यात येत आहे.
शहरात भाजपकडे सर्वाधिक माजी नगरसेवक तसेच इच्छुक आहेत, असे सांगितले जात आहे. ही बाब लक्षात येऊन भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्याबाबत वरिष्ठांनाही सांगण्यात आले आहे. स्थानिक पदाधिकायांच्या निर्णयास पक्षश्रेष्ठींनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी हा दुसरा मोठा पक्ष आहे. पक्षाकडे माजी नगरसेवक; तसेच इच्छुकांची संख्या अधिक असल्याचा विश्वास स्थानिक पदाधिकारी दाखवत आहेत.
राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही याबाबत वारंवार दुजोरा दिला जात आहे. पक्षाचे अनेक मास लीडर नेते शहराचे दौरे करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीतही स्वबळाचा नारा वारंवार दिला जात आहे. पुण्यातील बैठकीतही त्यांनी तसे स्पष्ट संकेत दिले. विकास आराखडास विरोध करण्यासाठी महापालिकेवर महामोर्चा काढण्यात होता. लोकहितासाठी पक्षाने आक्रमक भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.