पीओपी विल्हेवाटीसाठी तज्ज्ञांची समिती; सहा महिन्यांत अहवाल देण्याचे निर्देश

    07-Aug-2025
Total Views |
 

navy 
 
 
राज्यात निर्माण हाेणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे (पीओपी) पर्यावरणपूरक पद्धतीने जलद विघटन किंवा पुनर्वापर करण्याबाबत उपाययाेजना सूचवण्यासाठी राज्य सरकारने राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. समितीस सहा महिन्यांत अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. राज्यात पर्यावरणाला नुकसान पाेहाेचवणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावरून उच्च न्यायालयाने प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीवर बंदी घातली हाेती.मात्र, राज्य सरकार आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अहवालानंतर पीओपीच्या गणेशमूर्ती तयार करण्यावरील बंदी उठवताना
 
उच्च न्यायालयाने प्लॅस्टर ऑफ पॅरिस विल्हेवाटीबाबत उपाययाेजना करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले हाेते. पीओपीचा पुनर्वापर किंवा त्याचे पर्यावरणपूरक पद्धतीने जलद विघटन करण्यासाठी उपायाेजना सूचवण्यासाठी सरकारने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीत रसायन तंत्रज्ञान संस्था, आयआयटीचा पर्यावरण विज्ञान विभाग, राष्ट्रीय रासायनिक प्रयाेगशाळा (पुणे), राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयाेग, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (निरी), केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.