आपल्याकडे ऑलिव्ह ऑइल हे आराेग्यदायी तेल म्हणून वापरात आलं त्यालाही आता वीसेक वर्षं झाली असतील.सुरुवातीला श्रीमंतांचं फॅड वाटणारं हे ऑइल आता अनेक घरांमध्ये असतं. काँटिनेंटल पदार्थांमध्ये, सलाड्समध्ये ते आवर्जून वापरलं जातं. आराेग्यसजग धनवंत लाेक राेजच्या खानपानातही त्याचा वापर करतात. या तेलाचा उष्मांक कमी असल्यामुळे कमी उष्णता वापरणाऱ्या किंवा उष्णताविहीन स्वयंपाकात ते प्रभावी ठरतं. या तेलाचे दाेन प्रकार मिळतात.दाेन्ही महागच असतात, पण एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल अधिक महाग असतं, त्या तुलनेत व्हर्जिन ऑइल स्वस्त असतं.
हा काय प्रकार असताे? ऑलिव्ह जेव्हा घाण्यात टाकली जातात, तेव्हा पहिल्या धारेचं जे तेल निघतं, ते असतं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल. त्यात ऑलिव्हमधली सगळी नैसर्गिक गुणवत्ता शुद्ध स्वरूपात आणि भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे ते अधिक आराेग्यदायी असतं. एकदा चरकातून निघालेली ऑलिव्ह परत पिळली जातात, तेव्हा जे तेल मिळतं, ते असतं व्हर्जिन ऑइल. त्यात गुणतत्त्वं कमी, त्यामुळे किंमत कमी. हे पाहून इथे एकाने एक्स्ट्रा व्हर्जिन काेकाेनट ऑइल विकायला काढलंय, ते फक्त मार्केटिंग गिमिक आहे. जे पहिल्या धारेचं खाेबरेल असतं, त्याला व्हर्जिन काेकाेनट ऑइल म्हणतात. त्यात एक्स्ट्रा व्हर्जिन हा प्रकारच नसताे.