जिल्ह्यात जैवविविधतेच्या संवर्धनासह स्थानिकांना राेजगार आणि पर्यावरण पर्यटनाच्या दृष्टिकाेनातून सातपुडा जंगल सफारीचा पहिला टप्पा सुमारे अडीच काेटी रुपये निधीतून नुकताच पूर्ण करण्यात आला आहे. जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाच हजारांची दाेन तिकीटे खरेदी करून दीड तास या जंगल सफारीचा मनमुराद आनंद लुटला.सातपुडा जंगल सफारी, हा ग्रामीण विकास आणि पर्यावरण संवर्धनाचा अभिनव संकल्प आहे. या माध्यमातून स्थानिक तरुणांना राेजगाराच्या संधी उपलब्ध हाेतील. ही केवळ सफारी नाही, तर सातपुड्याचा आत्मा जपणारी संस्कृती आहे. थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाल परिसराला नवा चेहरा त्यामुळे मिळणार आहे. तरुणांनी येथे छाेटी-माेठी हाॅटेल्स, खानावळी उभाराव्यात. प्रत्येक कुटुंबानएकदा तरी येथे येऊन निसर्गाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी उद्घाटनप्रसंगी केले.
शासनाच्या निधीतून प्रारंभी फक्त मूलभूत पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वारासह अंतर्गत रस्ते, पाच सफारी वाहने, 18 प्रशिक्षित गाईड आणि चालकांच्या नियुक्तीचा त्यात समावेश आहे. जैवविविधतेचे संवर्धन, स्थानिकांना राेजगार आणि पर्यावरण पर्यटनाच्या दृष्टिकाेनातून हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.सातपुडा जंगल सफारीसाठी एका गाडीचे तिकीट अडीच हजार रुपये आहे.पालकमंत्री पाटील यांनी पाच हजार रुपये देऊन दाेन गाड्यांची तिकीटे खरेदी केली. या अर्थाने ते जंगल सफारीचे पहिले पर्यटक ठरले. त्यांच्यासाेबत रावेर-यावलचे आमदार अमाेल जावळे, उपवनसंरक्षक जमीर शेख, सहायक वनसंरक्षक समाधान पाटील आणि वन विभागाचे अधिकारी सहभागी झाले हाेते. सफारीदरम्यान पालकमंत्र्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.