पुणे, 3 ऑगस्ट (आ.प्र.) :
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे संघर्षमय जीवन, त्यांचे महान कार्य, अजरामर साहित्य जगासमोर येण्याकरिता त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल, याकरिता निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्य खंड क्रमांक पाच, सहा आणि सात च्या साहित्य प्रकाशन समारंभात ते बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार अमित गोरखे, विजय शिवतारे, सुनील कांबळे, हेमंत रासने, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून क्रांती घडवली. समाजाला तेज, स्फुलिंग दिले. साहित्यातील एक एक व्यक्तिरेखा जिवंत केल्या. यांच्या लिखाणामध्ये करुणा, संवेदना, क्रांती, काव्य आणि एक वैेिशकता पाहायला मिळते.
अण्णा भाऊंचे साहित्य जगातील 22 भाषांत अनुवादित झाले असून, त्या-त्या देशात ते प्रसिद्ध आहेत; तसेच देशातील विविध विद्यापीठांत त्यांच्या साहित्यांवर संशोधन सुरू आहे. अण्णा भाऊंनी कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, सिनेमा पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवासवर्णन आदी साहित्य आणले. त्यांच्या साहित्यावर आज हजारो लोक पीएचडी करीत आहेत. खऱ्या अर्थाने ते एक चालतेबोलते विद्यापीठ होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांच्या पोवाडा, गीतांमध्ये तरुणाईला स्फुर्ती देण्याचे काम केले.’ अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारणार अण्णा भाऊ यांच्या संघर्षमय जीवनातून त्यांचे व्यक्तिमत्त्व मोठे झाले. त्यांच्या लेखणीतून समाजाला दिशा, प्रेरणा, सामान्य माणसाला बळ, वंचितांचा आवाज देण्याचे कार्य केले.
अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाकरिता 25 कोटी रुपये दिले असून, स्मारकाचे आराखडेही तयार झाले आहेत. लवकरच स्मारक पूर्ण करण्यात येईल, असेही फडणवीस म्हणाले. अण्णा भाऊंची स्मृती चिरंतर जपणार उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, अण्णा भाऊ साठे हे साहित्यिक, शाहीर, लढाऊ व्यक्तिमत्त्व, प्रस्थापित मराठी साहित्य, संस्कृती, परंपरा नाकारणारे पहिले दलित बंडखोर लेखक होते. त्यांचे साहित्य प्रबोधन व परिवर्तनवादी होते. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि वारसा शेवटच्या घटकापर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले. त्यांच्या शाहिरीने संयक्त महाराष्ट्राच्या लढ्याला बळ मिळण्यासोबत अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा समाजात निर्माण केली.