पाणी मीटरला विरोध करणाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल होणार

पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे ः महापालिका प्रशासनाचे आवाहन

    04-Aug-2025
Total Views |
 
 dd
 
पुणे, 2 ऑगस्ट (आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
पाण्याचा अतिरिक्तवापर नियंत्रित करण्यासाठी समान पाणी योजनेअंतर्गत महापालिका महिनाभरात उर्वरित 77 हजार पाणी मीटर बसविणार आहे. पाणी मीटर बसविण्यास विरोध करणाऱ्यांवर शासकीय कामांत अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल. नागरिकांनी पाणी मीटर बसविण्यास आणि पाण्याचे योग्य नियोजन करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप रामचंद्रन यांनी केले आहे. महापालिकेच्या वतीने शहरात समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. याअंतर्गत शहरात 83 पाण्याच्या टाक्या; तसेच एक हजार कि.मी.हून अधिक पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. पाण्याच्या 65 हून अधिक टाक्यांचे काम झाले असून, काही कि.मी. पाइपलाइनचे काम अडचणींमुळे राहिले आहे.
 
व्यावसायिक आणि निवासी ग्राहकांना देण्यात येणाऱ्या नळजोडांवर पाण्याचे मीटर बसविण्याचे काम सुरू आहे. मीटरद्वारे मानकांनुसार पाणीपुरवठा करणे व अतिरिक्त वापर करण्यास प्रतिबंध आणून गळती रोखणे आणि उपलब्ध पाण्याचे सर्वच भागांत वाटप करण्याचे नियोजन या योजनेअंतर्गत करण्यात आले आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या आठवड्यात महापालिकेत बैठक घेऊन पाण्याची गळती रोखण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. याचाच भाग म्हणून महापालिकेने समान पाणीपुरवठा योजनेतील पाण्याचे मीटर बसविण्याचे काम महिनाभरात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या योजनेमध्ये सुरवातीला मिळकतकर विभागाकडील डाटानुसार सव्वातीन लाख मीटर बसविण्यात येणार होते; परंतु यानंतर ही संख्या दोन लाख 90 हजारांपर्यंत कमी झाली. आता महापालिकेने ग्राहक सर्वेक्षणानुसार दोन लाख 63 हजार मीटर बसवावे लागतील. यामध्ये पाच टक्के वाढ धरण्यात आली आहे. यापैकी एक लाख 85 हजार मीटर बसविण्यात आले आहेत.
 
उर्वरित साधारण 77 हजार मीटर बसविण्याचे काम अद्याप बाकी आहे. मीटर बसविण्यासाठी मुख्य कंपनीने पाच ठेकेदारांची नियुक्ती केली असून, प्रत्येक ठेकेदाराने महिनाभरात पंधरा हजार मीटर बसवावेत, असे आदेश देण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकुमार जगताप यांनी दिली. या संदर्भात अधिक माहिती देताना जगताप यांनी सांगितले, की पाणीपुरवठ्याच्या 141 झोनपैकी 40 झोनचे काम पूर्ण झाले आहे. या झोनमधील पाण्याचे मोजमाप सुरू करण्यात येत आहे. यापैकी 11 झोनमधील सहा झोनमधील अतिरिक्त पाण्याचा वापर 20 टक्क्यांच्या खाली आला आहे. शहरात चाळीस टक्के पाणीगळती होते.
 
मीटरनुसार पाण्याचा पुरवठा केल्यास अतिरिक्त पाणी वापर कमी होऊन प्रत्यक्ष गळती रोखण्यात मोठी मदत होणार आहे. यामुळे ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही, त्या भागाला पाणी पुरविणे शक्य होणार आहे. पाणीगळती न रोखल्यास भविष्यात पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. दरम्यान, अतिरिक्त आयुक्तांनी मीटर बसविण्यास नागरिकांनी विरोध करू नये, असे आवाहन केले आहे. विरोध करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असेही चंद्रन म्हणाले.
 
मीटर बसविण्यास विलंबाची कारणे
मीटर बसविण्यासाठी काही भागांत नागरिकांकडून विरोध होत आहे, तर काही ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि राजकीय कार्यकर्तेच विरोध करत आहेत. कोथरूड, मध्यवर्ती पेठा, धनकवडी, कात्रज, ससाणेनगर, येरवड्यातील आंबेडकरनगर, मार्केट यार्ड येथे प्रामुख्याने विरोध होत आहे. तर कोंढवा आणि महंमदवाडी येथे या योजनेचे पाइपलाइनचे काम पूर्ण झाले नसल्याने अगोदर मीटर लावण्यास विरोध होत आहे. मीटरद्वारे बील पाठविण्यासाठी संगणकीय प्रणाली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ही प्रणाली विकसित झाल्यानंतर डमी बिले पाठविण्यात येतील. आधुनिक पद्धतीने मीटर रीडिंग होणार असल्याने ज्या ठिकाणी अतिरिक्त पाणी वापर होतो, तो रोखण्यास मदत होणार आहे.
 
मिळकतकरातील पाणीपट्टीपेक्षा मीटरने पाणीबिल कमी येणार
महापालिका सध्या मिळकतकरामध्ये निवासी ग्राहकांकडून वार्षिक 900 रुपये आकारणी करते. मीटरद्वारे पाणीपुरवठा करताना एक हजार लिटरसाठी 8 रुपये दर असेल. प्रत्यक्षात शुद्धीकरण आणि पुरवठा यंत्रणा निर्माण करण्यासाठी प्रशासनाचा 25 रुपये खर्च होतो. पाण्याचा योग्य वापर करून वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी देण्यासाठी योजना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांनी आतापर्यंत या योजनेला सहकार्य केले आहे. यापुढील काळातही सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी केले आहे.