जल्लोषपूर्ण वातावरणात ‌‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा‌’ विराजमान

    29-Aug-2025
Total Views |
 
 pu
पुणे, 28 ऑगस्ट
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‌‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्ट‌’चे बाप्पा मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात बुधवारी (27 ऑगस्ट) ‌‘रत्नमहाल‌’मध्ये विराजमान झाले. प्रेरणादायी आध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते दुपारी दीडच्या सुमारास मंत्रोच्चारात बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तत्पूर्वी, ढोल- ताशा पथकांच्या गजरात मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली होती, यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे सकाळी सव्वा आठच्या सुमारास ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन व जान्हवी धारीवाल- बालन या दाम्पत्याच्या हस्ते रंगारी भवनमध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विदिवत पूजा व आरती झाली.
 
त्यानंतर आढाव बंधूंचे नगारा वादन झाले. आकर्षक फुलांनी आणि केळीच्या पानांच्या खुंटांनी सजविलेल्या पारंपरिक रथात बाप्पाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी भवन परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर ही मिरवणूक आल्यानंतर बाप्पाच्या स्वागताला ढोल-ताशा पथकांनी केलेले वादन लक्षवेधक होते. श्रीराम पथक, कलावंत, वाद्यवृंद, विश्वगर्जना, स्वयंभू गर्जना, गजर, नूमवि अशी वेगवेगळी ढोल-ताशा पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती. तसेच, कलावंत पथकात वादन करणारा अभिनेता सिध्दार्थ जाधव यांच्यासह अन्य कलाकार हेही या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
 
मिरवणुकीत ‌‘श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा‌’ पथकाने मर्दानी खेळाचे केलेले प्रात्यक्षिक प्रत्येक चौकात भाविक-भक्तांचे आकर्षण ठरले. लाठी-काठी, तलवारबाजी, दांडपट्टा या खेळांचे सादरीकरण त्यांच्याकडून करण्यात आले. ही लक्षवेधक मिरवणूक पाहण्यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. बाप्पाची स्वागत मिरवणूक रंगारी भवनमध्ये पोहोचल्यानंतर प्रेरणादायी आध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. प्रमुख विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि त्यांच्या सुविद्य पत्नी जान्हवी बालन-धारीवाल यांच्या हस्ते ‌‘श्रीं‌’ची आरती करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि मोठ्या संख्येने गणेशभक्त उपस्थित होते. 
 
अधिकाधिक भाविकांनी बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा
सर्व गणेशभक्त आतुरतेने ज्या दिवसाची वाट बघत असतात, तो आजचा सर्वांत आनंदाचा दिवस होता. मोठ्या भक्तिभावाने बाप्पाचे आगमन झाले. प्रेरणादायी आध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या शुभहस्ते बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या पुढील दहा दिवसांच्या कालावधीत मोफत आरोग्य तपासणी शिबिरासह वेगवेगळे सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. अधिकाधिक भाविकांनी बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, ही विनंती.
-पुनीत बालन (उत्सव प्रमुख व वेिशस्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)
 
भक्ती आणि देशभक्ती या दोन्हींचा संगम
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या दर्शनाला मी सलग दुसऱ्या वर्षी येत आहे. याठिकाणी भक्ती आणि देशभक्ती या दोन्हींचा संगम आहे. यावर्षी गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा मान मला मिळाला. मला निमंत्रित केल्याबद्दल मी पुनीत बालन यांची आभारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेताना आपला धर्म, आपली संस्कृती, देशभक्ती जिवंत ठेवायची आहे हे लक्षात असू द्या. हे उत्सव त्याचे प्रतीक आहे. आपल्या सर्वाना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा.
-जया किशोरी (प्रेरणादायी आध्यात्मिक वक्त्या)
 
फेटा आणि कुर्ता परिधान केलेले कार्यकर्ते
गतवर्षीप्रमाणे यंदाही श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचा मिरवणूक रथ उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हाताने ओढण्याची सेवा केली. डोक्यावर भगवा फेटा आणि पांढरा कुर्ता परिधान केलेले कार्यकर्ते लक्ष वेधून घेत होते. ही मिरवणूक शिवाजी रस्त्यामार्गे बुधवार चौक, तांबडी जोगेेशरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, बाजीराव रोड मार्गे पुन्हा ‌‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट‌’च्या ‌‘रत्नमहाल‌’ येथे दाखल झाली.