छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रा- बिडकीन औद्याेगिक क्षेत्रात (ऑरिक सिटी) विविध कंपन्यांना औद्याेगिक भूखंडांचे वाटप करण्यास मंजुरी देण्यात आली. महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाऊनशीप लिमिटेड (एमआयटीएल) आणि एनआयसीडीसी या संस्थांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या भूखंड वाटप समितीने प्राधान्य व विस्तार या श्रेणींतील अर्जांचा विचार केला. प्रस्तावांची छाननी प्रकल्पाची व्यवहार्यता, उलाढाल, जमिनीची आवश्यकता आणि भविष्यातील विस्तार याेजनांच्या आधारे करण्यात आली.अर्जदारांनी सादर केलेल्या प्रकल्प अहवाल व कागदपत्रांच्या आधारे ही मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. राष्ट्रीय औद्याेगिक काॅरिडाॅर विकास महामंडळांतर्गत (एनआयसीडीसी) विकसित हाेणारे ऑरिक हे देशातील पहिले एकात्मिक ग्रीनफिल्ड स्मार्ट औद्याेगिक शहर आहे. मंजूर करण्यात आलेले हे भूखंड विशेष अन्नघटक, कागदी उत्पादने, इलेक्ट्राॅनिक्स उत्पादने, रस्ते बांधकाम यंत्रसामग्री आणि अलाॅय कास्टिंग या क्षेत्रांसाठी आहेत. या प्रकल्पांमधून एकत्रितरित्या दाेनशे काेटींपेक्षा जास्त गुंतवणूक हाेणार असून, सुमारे 1 हजार राेजगार निर्माण हाेणार आहेत.