पुणे, 23 ऑगस्ट (आ.प्र.) :
सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून कार्यक्षमतेला पारदर्शकतेची जोड द्यावी. इच्छाशक्ती असेल, तर बदल घडवता येतो. शासन चांगले काम करणाऱ्यांच्या कायम पाठीशी असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली. प्रशासनातील लोकाभिमुखतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियानात दुसऱ्या टप्प्यातील विभाग स्तरावरील पुरस्कार वितरण कार्यक्रमात पवार बोलत होते.
महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालक कार्यालयास प्रथम, तर बारामती परिमंडल कार्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवला. सोबतच वाडिया उपविभाग व चाकण एमआयडीसी उपविभागांनी या स्पर्धेत प्रशस्तिपत्रक मिळवले. प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे व बारामतीचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, वाडिया उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुनील गवळी, चाकण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेळके यांचा पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, मुख्य अभियंता सुनील काकडे यावेळी उपस्थित होते. वीजग्राहक हेच महावितरणच्या कामकाजाचा केंद्रबिंदू आहेत. या दृष्टीने सदैव वाटचाल चालू आहे. या पुरस्कारामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. आता पुढील 150 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा अभियानांतर्गत विविध ग्राहकाभिमुख सुधारणांना समर्पित भावनेने गतिमान करण्यात येईल, असे खंदारे यांनी सांगितले.