महापालिकेत सुरक्षेसाठी क्यूआरटी पथक; बेकायदा कृत्यांवर अंकुश

    23-Aug-2025
Total Views |
 
 pal
 
शिवाजीनगर, 22 ऑगस्ट
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) 
 
 महापालिकेच्या विविध विभागांच्या कारवाईदरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले, मारहाण; तसेच महापालिकेच्या उद्यानांमध्ये व संपत्तींवर होणारे बेकायदा कृत्य रोखवण्यासाठी महापालिकेने विशेष शीघ्र कारवाई दल (क्यूआरटी) स्थापन केले आहे. या पथकाद्वारे वादग्रस्त घटना रोखण्याबरोबरच उद्याने, क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळांची सुरक्षा सक्षम केली जाणार आहे. महापालिकेच्या क्यूआरटीचे पहिले पथक 1 सप्टेंबरपासून सुरक्षा ताफ्यात दाखल होणार आहे.
 
महापालिकेच्या विविध विभागांकडून सातत्याने कारवाई केली जाते. मात्र, अनेकदा या कारवाईदरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जीवघेणे हल्ले, मारहाण होते. प्रशासनाची अपेक्षा असते की पोलिसांनी हे प्रकार गंभीर गुन्हे म्हणून नोंदवून कठोर कारवाई करावी; परंतु अनेकदा किरकोळ गुन्हे दाखल करून औपचारिक कारवाई होते; तसेच क्षेत्रीय व परिमंडल कार्यालयांमध्ये किरकोळ वादावरून मारहाणीच्या घटना घडतात. वाहन डेपोमध्ये चोरीच्या घटनाही घडतात. उद्यानांमध्ये फिरायला आलेल्या महिलांशी छेडछाडीचे प्रकारही दिसून येतात. या सर्वांवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन काही महिन्यांपासून प्रयत्नशील होते.
 
या पार्श्वभूमीवर या घटना रोखण्यासाठी महापालिकेने सुरक्षा विभागातील 1,200 सुरक्षारक्षकांपैकी 50 जणांची निवड क्यूआरटीसाठी केली आहे. त्यांना आवश्यक सुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार 1 सप्टेंबरपासून क्यूआरटीचे पहिले पथक कार्यरत होईल. उर्वरित चार पथकांचे प्रशिक्षण पूर्ण होताच तीही लवकरच कार्यरत केली जातील. महापालिकेची कारवाई असो वा डेपोमधील चोरी, सर्वांवर अंकुश ठेवण्यासाठी क्यूआरटी पथक सतत सक्रिय राहील, असे महापालिकेचे सुरक्षा अधिकारी राकेश विटकर यांनी सांगितले.
 
येथे होईल पथक तैनात ः
अतिक्रमण विभाग, आकाशचिन्ह परवानगी विभाग, 15 क्षेत्रीय कार्यालये, 5 परिमंडळ, वाहन विभाग, कचरा डेपो, उद्याने यांसह जिथे गरज असेल तिथे क्यूआरटी पथक तैनात केले जाईल. चोरी, छेडछाड, वादविवाद आणि इतर बेकायदा घटनांची त्वरित माहिती सुरक्षा विभागाला मिळेल व क्यूआरटी पथक तत्काळ संबंधितांना मदत करेल. पथकाला स्वतंत्र वाहन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी आठ जवान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात राहतील.