आता एका ॲपवर पीएमपीएमएल आणि मेट्रोचे तिकीट उपलब्ध होणार; प्रवाशांचा वेळ वाचणार

    23-Aug-2025
Total Views |
 
 met
 
स्वारगेट, 22 ऑगस्ट
(आज का आनंद न्यूज नेटवर्क) :
 
पुणेकरांसाठी मोठी सुविधा लवकरच सुरू होणार आहे. आता पीएमपीएमएलचे प्रवासी आपल्या मोबाइल ॲपद्वारे पुणे मेट्रोचे तिकीटही खरेदी करू शकतील. नुकत्याच झालेल्या बैठकीत पीएमपी प्रशासन आणि मेट्रो प्रशासन यांच्यात दोन्ही तिकीट प्रणाली एकत्रित करण्यासाठी आवश्यक असलेल्या एपीआय ट्रान्सफरबाबत सहमती झाली आहे. दोन्ही संस्थांच्या तांत्रिक विभागांची महत्त्वपूर्ण बैठक पुढील आठवड्यात होणार असून त्यात ही नवीन तिकीट प्रणाली कधीपासून सुरू करायची आणि त्यासाठी कोणत्या तांत्रिक तयारीची आवश्यकता आहे यावर निर्णय घेतला जाईल. ही योजना लागू झाल्यानंतर पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि एकात्मिक होणार आहे.
 
गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी आणि मेट्रो प्रशासन तिकीट प्रणाली एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, ठोस प्रगती होत नव्हती. आता पीएमपी अध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर एपीआय ट्रान्सफरची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल आणि खर्चातही बचत होईल. किती प्रवाशांना होईल फायदा पीएमपीचे ‌‘आपली पीएमपीएमएल‌’ हे ॲप तब्बल 10 लाख प्रवाशांनी डाउनलोड केले असून, ते नियमित वापरले जाते. मेट्रो ॲप सुमारे 1 लाख प्रवाशांनी डाउनलोड केले आहे. दोन्ही ॲप्सची तिकीट प्रणाली एकत्र आल्यानंतर प्रवाशांना एका ॲपवरूनच पीएमपी आणि मेट्रो दोन्हीचे तिकीट खरेदी करता येणार आहे.
 
लवकरच सुरू होणार सेवा एकात्मिक तिकीट प्रणालीसंदर्भात मेट्रो अधिकाऱ्यांशी चर्चा पूर्ण झाली आहे. एपीआय शेअर करण्याचा निर्णय झाला असून, ही सुविधा फार लवकर सुरू होईल.
-पंकज देवरे, (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे)